" जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म."
000o000
" जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म. आयुष्य एक सातारीसारखं वाद्य आहे. ती सतार वाजवण्याचं सामर्थ्य आणि कला अवगत करून घेणं, हाच धर्म. तो धर्म समजला तर छोट्या बिजातून प्रचंड वृक्ष जन्माला येतो. त्यावर पक्षी येऊन बसतात. गातात. त्यांचे संसार बहरतात. पैशाशिवाय. पक्षांचं धन वेगळंच असतं. गाणं हेच त्यांचं आयुष्यभराचं कार्य. पक्षी पिल्लांसाठी घरं बांधतात. स्वतः वळचणीखाली राहतात. मला सांगा, एकातरी पक्षाची हाउसिंग सोसायटी आहे का? तसं असतं तर झाडाझाडांवर अनेक अनधिकृत कॉलनीज दिसल्या असत्या. पाखरं घरं बांधतात पिल्लांसाठी. पिल्लाला मुक्त आकाश खुलं झालं की घर आपणहोऊन काटक्या टाकतं. म्हणून झाडंही नोटीसा पाठवत नाहीत. मनाचा हा मोठेपणा झाडं जमिनीपासून शिकतात आणि पावसाचा वर्षाव करून आकाश जमिनीवर प्रेमाचा अभिषेक करतं. सृष्टीतल हे नातं ओळखता आलं की सतार योग्य हातात पडली, असं समजावं. हाच धर्म.
वपुर्झा /151/Surendra / 03042025