गुरुवार, २६ जून, २०२५

" माणूस हा किती संकेतांनी जखडला गेलेला असतो पाहा!"

" माणूस हा किती संकेतांनी जखडला गेलेला असतो पाहा!

                                  000o000

                "  ह्या अफाट चक्रावरचे आपण एक घटक. घटकलाच पूर्णचक्र समजावं ही अपेक्षाच अवास्तववादी. एका घटकाने दुसऱ्या घटकालाच जास्तीत जास्त जाणून घेण्याची धडपड करावी आणि ते करत असतानाच स्वतःच्या प्रवासाची बांधाबांध करावी. दुसरं काय? माणूस हा किती संकेतांनी जखडला गेलेला असतो पाहा! ' प्रवास ' शब्द उच्यारला की पाठोपाठ ' बांधाबांध ' हाच शब्द डोक्यात येतो. ' इथून-तिथे ' या दोन शब्दातलं अंतर जोपर्यंत' मैलात ' मोजता येतं, तोपर्यंतच बांधाबांध ह्या शब्दाला अर्थ आहे. पण जिथे मैलांचा हिशोब नाही तिथं डागांचाही नाही. एकदम ट्रॅव्हल लाईट! पण परंपरेने बांधलेले आपण, प्रवास म्हटलं की विचार सामानाचा, बरोबर काहीतरी न्यावं लागतं हेच मनावर बिंबलेलं. त्याला कोण काय करणार? पाच वर्षाच्या मुलालाही आपण छोटी पिशवी देतो आणि ' हिला सांभाळायचं ' असं सांगतो. नंतरच्या आयुष्यात मात्र आपण गळ्यात पडणाऱ्या पिशव्या कशा झटकता येतील ह्याचा विचार करीत राहतो. फार मजा वाटते. फनी वाटतं. आपला मुलगा एखादं वाक्य उलटून बोलला की संताप येतो. कारण  ' उलटून बोलायचं नसतं ' अशी एक पिशवी आपण त्याच्या गळ्यात कधीच लटकवलेली असते. अशा तऱ्हेच्या  भ्रामक, खुळचट पिशव्या आपण बाळगतो. पाप-पुण्य, नीती-अनीती, श्त्री-पुरुष सहवास, व्यसनं..... कितीतरी! अशाच कुणाला तरी आपण केव्हा केव्हा खूप दिवसांनी पाहिल्यावर विचारतोही, ' एवढे थकल्या सारखे, ओढल्यासारखे का दिसताय? त्याच्या खांद्यावरच्या पिशव्यांची त्यालाही जाणीव नसते, तो म्हणतो, ' तसा आता मी बरा आहे, पण मधून मधून एकदम थकवा येतो. थकवा कशाचा असं विचारलं तर सांगता येणार नाही. "

वपुर्झा /133/Surendra / 26062025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा