शनिवार, २८ जून, २०२५

" रस्त्याचे आत्मचरित्र "

" रस्त्याचे आत्मचरित्र "

                               000o000

                "  लहानपणी निबंधासाठी एक विषय ठरलेला असायचा. कोणत्यातरी निर्जीव वस्तूचं आत्मचरित्र. परवा फिरायला जातांना सहज रस्त्याला म्हटलं, ' कसं काय? ' आणि रस्ता म्हणाला, " संपूर्ण राष्ट्राच्या जीवनात रस्त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. ज्या गावाला रस्ता नाही, त्या गावाला अस्तित्व नाही. राष्ट्राची सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक प्रगती रस्त्याशिवाय अशक्य. त्यासाठी आम्ही काय काय सहन करतो? अवाडव्य वाहनांखाली आम्ही नित्य जगतो, मरतो. तुम्ही माणसं आमच्या अंगावर कुठेही गलिच्छपणे थुंकता. रस्त्याच्या दोन्ही कडांना नको ते विधी करता. तुम्हा मनावांची घाण आम्ही अंगावर तर घेतोच, पण आमच्या पोटातूनही तीच घाण सतत वाहत असते. तुम्ही रस्ते खणता, वर्षानुवर्षे दुरुस्तीच्या नावाखाली उकळतं डांबर ओतात. तुमचं पिण्याचं पाणी आणि त्याचे अजस्त्र नळ आमच्याच आतड्यातून, टेलिफोनच्या तारा आणि काय काय सांगू? अर्थातं आमचा जन्मच त्याच्यासाठी आहे. आमची जी कर्तव्य आहेत त्यापासून आम्ही मागे सरकणार नाही. आम्हाला परतीची वाट नाही. पण आता आमचं जे प्रयोजन आहे, त्यालाच धक्का लागायची वेळ आली." " म्हणजे?     "आम्हाला मोर्चाचा भार पेलत नाही." " येस. मोर्चा इस द लास्ट स्ट्रॉं ऑन द कॅमल्स बॅक. ", " आम्ही स्थिर आहोत म्हणून देश गतिमान आहे. वाहत असणं हा आमचा धर्म आहे आणि तुम्ही रस्तेच अडवता. ज्या कामासाठी आमची योजना आहै. तेच काम जर आम्हाला करू दिलं नाही तर इथे राहायचं कशाला?, चला रे. " सगळे रस्ते एकएकी जायला निघाले. मी जिवाच्या आकांताने म्हणालो, " आम्ही काय करायचं? " " संप, हरताळ, मोर्चे ह्यात आमचा जीव गेला. तुम्ही आता तुमच्या अस्तित्वासाठी.... आणि प्रगतीसाठी.... नवे रस्ते शोधा. "

वपुर्झा /136/Surendra / 28062025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा