गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

त्यावरून लहान मुलांची मतं बनतात."

"  त्यावरून लहान मुलांची मतं बनतात."

                           000o000

                " माणसांची माणसांबद्दल मतं कशी तयार होतात, हे पाहणं मोठं मजेच असत. स्वतःच्या अनुभवांवरून ठाम निष्कर्ष काढण्याची परिपक्वता प्रत्येकाला निरनिराळ्या वयात येत असेल. पण प्रारंभीच्या काळात ही मतं बनवण्याच काम घरातली मोठी माणस करीत असतात. पाहुण्यांची पाठ वळल्याबरोबर जे त्यांच्या बद्दल बोललं जातं किंवा ती व्यक्ती मागे जे वातावरण निर्माण करून जाते, त्यावरून लहान मुलांची मतं बनतात."


वपुर्झा /109/Surendra /28022025

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२५

" निर्माल्य म्हणजे हौतात्म्य. धुळीचा पेहेराव म्हणजे अमरता."

"  निर्माल्य म्हणजे हौतात्म्य. धुळीचा पेहेराव म्हणजे अमरता.

                           000o000

                "  व्यवहाराला गंध नसतो. स्पर्श नसतो. गोंगाट असतो. रुचीच नसते. मग अभिरुचीची बातच दूर. व्यवहार प्लास्टिकच्या फुलांसारखा असतो. प्लॅस्टिकची फुल सुकत नाहीत आणि ही तर इम्पोरटेड फुल. या फुलांचे रंग विटत नाहीत. ही फुल ज्यांना परवडतात त्यांच्या माना, त्या फुलांच्या देठासारख्याच ताठ राहतात. त्याचं निर्माल्य होत नाही. जन्मच नाही, तिथं मरण कुठलं? ह्या फुलांना फक्त धुळीचा शाप. सर्फने धुतली की झालं. पण नळाखाली धरल्यावर ती शहारून येत नाहीत. जन्ममरणाचाच फेरा नसेल, तर शहारे, रोमान्स, आसक्ती, विरह - मिलन, भय, सगळ्यातूनच मुक्ती. जिवंत फुलं स्वाभिमानी असतात. धुळीचा थर जमण्याआधीच मरण पत्करतात. निर्माल्य म्हणजे हौतात्म्य. धुळीचा पेहेराव म्हणजे अमरता.

वपुर्झा /106/Surendra /27022025

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

" क्षमा कोणत्या कारणासाठी मागावी लागत आहे, ह्याच आत्मनिरीक्षण करावं."

"  क्षमा कोणत्या कारणासाठी मागावी लागत आहे,  ह्याच आत्मनिरीक्षण करावं."

                           000o000

                "  शरण आल्याने फरक पडत नाही. रिaलायझेशन केवळ पाय पकडून होत नाही. क्षमा मागणारा माणूस जास्त धोकेदायक. क्षमा मागं, चूक कबूल करणं हा बहाणा असतो. पुन्हा पहिल्याच मार्गावर जाण्याचा परवाना असतो. कारण वाकाव लागलं ह्याचा खोलवर राग असतो. कुणाचा तरी अपमान केला, असभ्य उद्गार काढले, आपल्या प्रतिमेला तडा गेला, तो सांधण्यासाठी माणूस क्षमा मागतो.  आपण मूळचे तसे नाही आहोत, हे ठसवण्याचा तो दुबळा प्रयत्न असतो. क्षमा मागण्याने पुन्हा पहिल्यासारखच वागण्याची मोकळीक मिळते. त्याऐवजी आपल्याला क्षमा कोणत्या कारणासाठी मागावी लागत आहे,  ह्याच आत्मनिरीक्षण करावं."

वपुर्झा /106/Surendra /26022025

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५

" आनंदाला परिवार हवा, सगेसोयरे हवेत."

" आनंदाला परिवार हवा, सगेसोयरे हवेत." 

                     000o000

                " यांत्रिक हालचालीने हसता येत. फोटोतली हसणारी व्यक्ती म्हणजे हसऱ्या व्यक्तीचा फोटो नव्हें. ' ह्या फोटोत तुम्ही किती छान हसत आहात ' अस कुणी म्हटल, तर नव्याने प्रसन्न कुठे वाटत? ' आणि रडतांना कुणी फोटो काढत नाहीत. रडण भोगायचं असत. हसण उपभोगायच असत. ह्याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा, सगेसोयरे हवेत. आनंदाला सहल हवी, दुःखाला घर हवं. "

वपुर्झा /104/Surendra /25022025

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२५

" आपला नवरा एकदम इब्लिस आहे.*

" आपला नवरा एकदम इब्लिस आहे.*

                     000o000

                "  प्रत्येक पुरुषाच्या बायकोला अस वाटतं की आपण फार सहनशील, साध्या, भोळ्या, मूकपणाने संसारातले फटके खाणाऱ्या आहोत आणि आपला नवरा एकदम इब्लिस आहे. त्याला जहांबाज बायको मिळणं फार जरुरीचं होत. वास्तविक प्रत्येक बाई स्वतःच्या नवऱ्याशी यथास्थित खंबीरपणाने, सावधगिरीने संसार करत असते. तरीही दुसरी बाई तिला फटकळ वाटते , नवऱ्याचा मान न सांभाळणारी दिसते आणि तिला वाटते की, अशी बाई आपल्या नवऱ्याला मिळायला हवी होती.*

वपुर्झा /102/Surendra /24022025

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

" जगण्यासाठी प्रयोजन मिळालं की माणूस जगतो."

"  जगण्यासाठी प्रयोजन मिळालं की माणूस जगतो."

                           000o000

                "  जगण्यासाठी प्रयोजन मिळालं की माणूस जगतो. तो प्रयोजन शोधत असतो. बायको, प्रेयसी, मुलंबाळं, नोकरी , पत, प्रतिष्ठा, पैसा, वाहन, कीर्ती, मानसन्मान..... जितके डबे जोडता येतील तितके जोडायचे. व्याप वाढत गेला की बँकर्स शोधायचे. घाट संपला की बँकर्स सोडून द्यायचे. त्याच पळापळीत, गरज संपली आणि हौस भागली की आपल्यालाही तोडणारे भोवती असतात. पुन्हा एकाकीपण सुरू. अशा एकटेपणात ज्या माणसांकडे त्याचं जगण्याचं प्रयोजन स्वतःच्या हातात नसतं, त्या माणसांच्या ' ने रे पांडुरंगा ' आरोळ्या सुरू होतात." 

वपुर्झा /101/Surendra /23022025

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२५

" मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येत नाही "

" मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येत नाही "

                     000o000

                "  मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येत नाही. त्याच कारणच हे, तो काटेकोरपणे वेळा सांभाळतो. वर्तमानकाळ जपतो. मागच्या पुढच्या क्षणांचं तो काही देणं लागत नाही. जीव वाचावा म्हणून केलेल्या प्रार्थनांशी त्याचा संबंध नाही. जिवाभावाचा माणूस त्याने नेला म्हणून तुम्ही दिलेले शिव्याशाप आणि पुढच्याच क्षणी नातेवाईकांनी फोडलेल्या किंकाळ्या तो ऐकत नाही.*

वपुर्झा /95/Surendra /22022025

" माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो. त्याला म्हणूनच हवी असते एक सोबत."

"  माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो. त्याला म्हणूनच हवी असते एक सोबत."

                           000o000

                "  माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो. त्याला म्हणूनच हवी असते एक सोबत. जिला मनातील सगळी स्पंदन समजतील, आकांत कळेल, आक्रोश उमगेल, महत्वाकांक्षा पेलेल अशी हवी असते. आयुष्यातली हीं मोठी गरज नियतीने भागवल्यावर माणसाचं समाधान व्हायला हवं. पण नाही. एकमेकांच एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे, हे आणखीन कुणालातरी समजावं अस त्याला वाटतं. अस का? ... .. ह्याला उत्तर नाही.

वपुर्झा /91/Surendra /21022025

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

" स्वार्थी किंवा स्वतःच्याच सुखाचा विचार करणाऱ्या माणसांच्या जगात इतरांना अस्तित्व नसतं "

" स्वार्थी किंवा स्वतःच्याच सुखाचा विचार करणाऱ्या माणसांच्या जगात इतरांना अस्तित्व नसतं " 

                     000o000

                " जगायचं - आणि तेही जनावरापेक्षा वेगळं जगायचं __ म्हटलं की भूतकाळही हवा आणि स्वप्नही हवीत. केवळ कटू आठवणींनीच भूतकाळ भरलेला असला, तरी तो हवा, त्याच्या आठवणीही हव्यात. भोगून पार केलेली संकट आणि यातना, त्यांच्या येत                  ऊच्याराबरोबरच वेगळं सामर्थ्य देतात. त्याची नशा माणसाला मस्त बनवते , मस्तवाल बनवत नाही. ' वर्तमान मानणारा माणूस अत्यंत अमानुष होतो. कारण ह्या माणसांच्या गरजा क्षणांशी निगडीत असतात. कार्यक्षेत्रच संकुचित निवडलं की, यशस्वी ठरायला वेळ लागत नाही. भूतकाळ ओझच टाकतो का? काही रम्य आठवणींचे नजराणे देण्याचे सामर्थही भूतकाळातच असतं . अनेक माणसांचा उपयोग आपण शिडीसारखा केलेला असतो. ज्यांना हे मोठेपण नाकारायच असतं, तीच माणसं गेलेल्या काळाच काही देणं लागतं नाहीत.' ' हेकट माणसाजवळ तर्कशास्त्र नसतं, तर स्वार्थी किंवा स्वतःच्याच सुखाचा विचार करणाऱ्या माणसांच्या जगात इतरांना अस्तित्व नसतं.

वपुर्झा /94/Surendra /20022025(2)

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५

" ह्या बहिणीच नाव ' तडजोड ' ही तुम्हाला आयुष्यभर साथ देते"

" ह्या बहिणीच नाव ' तडजोड '  ही तुम्हाला आयुष्यभर साथ देते"

                     000o000

                "  चांगलं आणि वाईट ह्या शब्दांना स्वतंत्र अर्थ आणि अस्तित्व असत का? ' हो ' आणि ' नाहीं ' ही.           ' तुलना ' नावाची राक्षसीण जोपर्यंत मध्ये उभी राहत नाही, तोपर्यंत ह्या शब्दांचा विहार चालतो. तिने हस्तक्षेप केलं की संपल ! ही राक्षसीण येतांना एकटी येत नाही. तिच्याबरोबर तिची बहीण येते. ती तुम्हाला बहिणीच्या स्वाधीन करते आणि दुसऱ्या मनाचा बळी घेण्यासाठी ती निघून जाते. ह्या बहिणीच नाव ' तडजोड '  ही तुम्हाला आयुष्यभर साथ देते. 

वपुर्झा /94/Surendra /20022025

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५

" उशाशी त्या क्षणी डॉक्टर असेलच तर ते म्हणतात, ' I am sorry.' "

" उशाशी त्या क्षणी डॉक्टर असेलच तर ते म्हणतात, ' I am sorry.'

                     000o000

                "  काळ म्हटलं कीं वर्ष आली, महिने आले, महिन्याचे दिवस आणि दिवसांचे तासही आले. तासांनाही मर्यादा आहेच. सात दोनदा वाजतात. आठ, नऊ, दहा, अकरा, बारा,..... सगळे तास दोनदा वाजतात. एव्हढया प्रचंड, अनादि- अनंत काळाची किती छोटी शकलं? चोवीस तासांचा एवढास्सा तरजू. तो कसा काळाला न्याय देईल? दोन पायांचा माणूसही मग काळापेक्षा वेळेचं भान जास्त ठेवतो. वेळेइतकाच छोटा होतो. क्षुद्र होतो. माणूस क्षुद्र होतो आणि काळचं काम सोपं होत. क्षुद्र कीटकला मारण्यासाठी फार बळ वापराव लागतं नाही. काळ फक्त वेळ साधतो. सेकंदाइतका छोटा होतो. उशाशी त्या क्षणी डॉक्टर असेलच तर ते म्हणतात, ' I am sorry.'

वपुर्झा /86/Surendra /18022025

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२५

" बायकोचा उपयोग मी कसाही करीन, तिनं चांगलंच वागण्याची ग्यारंटी दिली पाहिजे."

" बायकोचा उपयोग मी कसाही करीन, तिनं चांगलंच वागण्याची ग्यारंटी दिली पाहिजे." 

000o000

   "  बहुसंख्य माणसांना कशाची ना कशाची  ग्यारंटी हवी असते. ह्या मूर्ख माणसांना कसली ग्यारंटी हवी असते? ह्या माणसांचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही का? जगात हमी कशाची देता येते? ' आय प्रॉमिस टु पे द बेअरर ' ---- ह्या शब्दाकडे गहाण पडलेल्या माणसांना यंत्र आणि मानवी मन ह्यातला फरक समजतं नाही. माणूस ग्यारंटी मागतो, त्यामागे खरच काय धारणा असेल? चपलेचा अंगठा शिवून देणाऱ्या चांभाराकडेही एक रुपयाच्या बदल्यात आपल्याला हमी हवी असते. तो शांतपणे सांगतो, " साहेब, चपलेचा अंगठा किती टिकेल, ते चालण्यावर अवलंबून हाय!". हे उत्तर आपल्याला व्यावसायिक चातुर्याच वाटत. आम्ही कसेही चाललो, चप्पल कशीही वापरली, तरी ती ' टिकली पाहिजे ' हा हेतू. चप्पल काय आणि संसार काय -- तो कुणाच्या हातात पडतो त्यावर अवलंबून. बायकोचा उपयोग मी कसाही करीन, तिनं चांगलंच वागण्याची ग्यारंटी दिली पाहिजे.

वपुर्झा /84/Surendra /17022025(2)

रविवार, १६ फेब्रुवारी, २०२५

" आयुष्यात मग माणसाला वेगवेगळे पाय फुटायला लागतात."

"  आयुष्यात मग माणसाला वेगवेगळे पाय फुटायला लागतात."

                           000o000

                "  चालायला शिकणार मूलच फक्त स्वतःच्या पायांवर चालत. ते जस जस मोठ व्हायला लागतं तसं तसं ते स्वतःला पाय आहेत हे विसरायला लागतं. नंतरच्या आयुष्यात मग माणसाला वेगवेगळे पाय फुटायला लागतात. पत, ऐपत, प्रतिष्ठा, पैसा, सत्ता, कीर्ती, यश, लौकिक, प्रसिद्धी, राजकारण, स्पर्धा, पक्ष, जात, धर्म  परंपरा, रूढी..... पायच पाय. ह्या पायांच्या जोरावर तो आयुष्यभर लाथाळी करतो. हळूहळू एकेक पाय गळायला लागतात. 'सत्ता ' हा एक महत्वाचा पायच जातांना खूपच पाय नेतो. वार्धक्य जवळ येईतो सगळं गेललं असतं. तोपर्यंत आपल्याला स्वतःचे पाय होते ह्याच विस्मरण झालेलं असतं, ज्यामुळे तो माणूस आहे हे ओळखलं जात होत. वार्धक्यात गुढगे गेले असं म्हणायचं. खरं तर सगळे पायच गेलेले असतात. 

वपुर्झा /83/Surendra /17022025

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५

"आपण सिव्हिलियन्स. आपली युद्ध वेगळी."

"आपण  सिव्हिलियन्स. आपली युद्ध वेगळी."

                           000o000

                "  असा बघतोस काय मित्रा? -- बाबा रे, आयुष्य हे नुसतं जगण्यासाठी नसून, ' मजेत जगण्यासाठी ' आहे. ' Life is for Living' ह्याच्यापुढे ' Happily' हा शब्द आपण लिहायचा आहे. कितीही किंमत मोजावी, पण हसत जगाव. पर्वा करू नये. त्यासाठी प्रथम स्वतःच रक्षण करावं. ' आत्मानं सततं रक्षेत!' आता हे रक्षण कुणापासून? परचक्रापासून? No राजा No! युद्ध वारंवार होत नाहीत. आणि झाली तरी त्यासाठी मिल्ट्री आहे. आपण    सिव्हिलियन्स. आपली युद्ध वेगळी. आपला बुद्धिभेद करणारी माणसं सतत आपल्या आसपास वावरत असतात,  त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करायला हवं. "

वपुर्झा /56/Surendra /14022025

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२५

"आपण नक्की म्हातारे झालो, असं केव्हा समजावं?"

"आपण नक्की म्हातारे झालो, असं केव्हा समजावं?"

                     000o000

                "  आपण नक्की म्हातारे झालो, असं केव्हा समजावं? तर चमचमीत कांद्याची भजी खातांना जेव्हा खोकल्याची आठवण होते तेव्हा! उडी मारून रुळ ओलांडायची भीती वाटते तेव्हा! जागरण म्हणजे रक्तदाब किंवा पंगतीतलं पिवळ्याधमक केशरी जिलेबीच ताट म्हणजे मधुमेह, असली त्र्यराशिक दिसायला लागतात तेव्हा! रस्त्यावरून जाणाऱ्या बाईकडे नजर जाण्याअगोदर तिच्या कडेवरच्या मुलाकडे जेव्हा प्रथम लक्ष जातं, तेव्हा म्हातारपण आलं असं खुशाल समजावं.

वपुर्झा /47/Surendra /12022025

" पोरकेपणा म्हणजे काय? "

"  पोरकेपणा म्हणजे काय? " 

                           000o000

                "  पोरकेपणा म्हणजे काय? आपली व्यथा इतरांना नं समजण हाच पोरकेपणा. केव्हा केव्हा हे पोरकेपण आपण लावून घेत नाही. हे असच असतं आयुष्यात, असं म्हणतो. स्वतःची समजूत स्वतःच घालतो. पण कुठेतरी ठिणगी पडते आणि सगळं खाक होत. असं हे पेटणं म्हणजे कापराचं पेटणं. मला स्वतःला जळायला आवडत. ज्याच्यात जळून जाण्याची ताकद आहे, तोच माणूस! पण त्याच वेळेला मला आमच्याकडे येत असतील तर नक्कीच शिवसेनेमध्ये त्यांचं स्वागत आहेहे असं कापराचं जळणं आवडत नाही. ह्याच कारण, मागे काही उरतच नाही. राखेच्या रूपाने का होईना, माग काहीतरी राहायला हवं. त्यां राखेतूनच काहीतरी निर्माण होण्याची आशा असते. व्यथासुद्धा कापरासारखी जळता कामा नये.  थैलीच तोंड सुटलं कीं सुटणारी तोंड घट्ट मिटतात. नीती - अनीतीच्या चौकटी शेवटी बँकेच्या काउंटरवरच ठरतांत. म्हणूनच पैशेवाल्यांना त्यांच्या भानगडी करणं आणि निस्तरण सोपं जातं. कारण समाजानंच त्यांना स्वाभाविकपणाची लेबलं बहाल केलेली असतात.

वपुर्झा /39/Surendra /12022025

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२५

"संसार बुद्धिमत्तेच्या जोरावर होत नाही नेहमी."

"संसार बुद्धिमत्तेच्या जोरावर होत नाही नेहमी."

                           000o000

                "  संसार बुद्धिमत्तेच्या जोरावर होत नाही नेहमी. तो होतो भक्तीतून, प्रेमातून. प्रेमाचा उगम मनात असतो. भक्तीने संसार करणाऱ्या स्त्रीने वैवाहिक जीवनातला प्रत्येक क्षण संसार आणि नवरा यासाठी जपलेला असतो. तिने स्वतःच निराळ अस्तित्व मानलेल नसतं. तिच्या साथीदारासाठी तिचा सतत त्याग चाललेला असतो. तो त्याग तिच्या साथीदाराने ओळखुन तिला सतत 'दाद ' द्यावी एव्हडीच तिची एकमेव इच्छा असते. आणि मग तेव्हड्याचसाठी तिला प्रेमात भागीदार नको असतात. आपला माणूस कायम आपलाच राहावा हीं पत्नीची भावना पण स्वाभाविकच. " 

वपुर्झा /38/Surendra /11022025

सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५

" माणूस कितीही मोठा असो. राजा असो - भिकारी असो, गरीब असो श्रीमंत असो, आई असो - बाप असो वा अगदी पोटचा पोर असो."

" माणूस कितीही मोठा असो. राजा असो - भिकारी असो, गरीब असो श्रीमंत असो, आई असो - बाप असो वा अगदी पोटचा पोर असो."

                     000o000

                " माणूस कितीही मोठा असो. राजा असो - भिकारी असो, गरीब असो श्रीमंत असो, आई असो - बाप असो वा अगदी पोटचा पोर असो. त्याच्या नशिबातले शेवटचे शब्द हेच, " उचला आता! ". सगळे अवयव म्हणे एकदा ब्रम्हदेवाकडे गेले आणि म्हणाले," आमच्यातला मोठा कोण हे सांगा. " ब्राम्हदेव म्हणाले " ज्याच्या वाचून अडतं तो मोठा. "  त्यावर प्रथम डोळे रुसून गेले. माणसाला देवाने विचारलं, ' डोळ्या शिवाय तू कसा जगलास? " त्यावर माणसाने सांगितले, ' जगलो एखाद्या आंधल्याप्रमाणे! '. मग कान रुसून गेले. पुन्हा प्रश्न विचारल्यावर माणूस म्हणाला, ' जगलो एखाद्या बहिऱ्याप्रमाणे! '. असं होता होता, सगळे अवयव रुसून थकले. शेवटी प्राण रुसून जायला लागला आणि माणूस उत्तर द्यायला उरलाच नाही. तेव्हा जेहेत्ते कालाचे ठायी, सर्वात महत्वाचा प्राण. म्हणूनच तो एकदा रुसून गेला कीं बाकीचे म्हणतात ' उचला आता ! ".

वपुर्झा /36/Surendra /09022025

शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२५

"तो लेखक नसेल, पण प्रतिभावंत असतो."

"तो लेखक नसेल, पण प्रतिभावंत असतो."

                           000o000

                "  संसार यां शब्दा बरोबरच संघर्ष हा आलाच. संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसाबरोबरच असतो, असं नाही. नको वाटणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवरच आली कीं, स्वतःशीच संघर्ष सुरु होतो. संसारात यां संघर्षाचं खापर फोडण्यासाठी जोडीदार मिळतो इतकंच. पण, असे हे संभाव्य संघर्ष कुणामुळेही निर्माण झाले तरी, एकमेकांना    ' गुड - नाईट ' म्हणण्यापूर्वी त्यां दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याच ताज्या मनाने स्वागत करायच. संसार यशस्वी करण्या साठी आणखी वेगळं काहीच करावं लागत नाही. नियती एक कोरा, करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर तुम्हाला बहाल करते. रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख्ख करणार डस्टर. त्यां स्वछ फळ्यावर आपण कालचेच घडे का लिहायचे? - जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने समोरा जातो, नवा मजकूर लिहितो, तो लेखक नसेल, पण प्रतिभावंत असतो. "                      वपुर्झा /25/Surendra /09022025

" त्यापेक्षा एकलेपणाचा शाप परवडला "

"त्यापेक्षा एकलेपणाचा शाप परवडला "

                           000o000

                "  शृंगार आणि वैराग्य एकत्र नांदत नाहीत, त्याचप्रमाणे संशय आणि भक्ती. वैराग्य केवळ तारुण्यावर आघात करीत असेल, पण संशय उभ्या आयुष्याची राख करतो. आयुष्यातले आनंदाचे क्षण, उपेक्षेचे हुंदके, दुःखाचे कड आणि आवर घातलेले आवेग - हे ज्याचे त्यालाच माहीत असतात. एखादा तरी साक्षीदार अशा उन्मळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा ह्यासारखी इच्छा पूरी नं होणं ह्यासारखा शाप नाही. पण साक्षीदार मिळून त्याला त्यातली उत्कटता नं कळण ह्यासारखी वेदना नाही. त्यापेक्षा एकलेपणाचा शाप परवडला . " 

वपुर्झा /23/Surendra /08022025(2)

" किती दमता तुम्ही? "

" किती दमता तुम्ही? "

                           000o000

                "  किती दमता तुम्ही? " ह्या एका वाक्याची माणसाला किती भूक असते हे सांगता येणार नाही. दहा माणसांचा स्वयंपाक करून दमलेल्या बाईला पण एवढं एकच वाक्य हवं असतं आणि कामावरून आलेल्या पुरुषालापण !  इतर कितीही गरजा असोत, पण हे एवढं एकच वाक्य ऐकायची ज्याला भूक आहे त्यां पुरुषाने आपल्या बायकोला कधीही नोकरीला लावू नये. पुरुषाला स्वयंपाक येऊ नये आणि बाईला नोकरीं करता येऊ नये. एकमेकांच्या कर्तृत्वाचे प्रांत एकमेकांना अनभिज्ञच हवेत. तरच एकमेकांच्या कर्तबगारीच कौतुक टिकतं. ' त्यात काय आहे, हे मी पण करीन ' - इथं अर्पणभाव संपला, स्पर्धा आली. कौतुक संपलं, तुलना आली. साथ संपली, स्वत्वाची जाणीव आली.

वपुर्झा /22/Surendra /08022025

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२५

" पतीपत्नीच एकच एक मत असल तर संसारात स्वर्ग निर्माण होतो."

" पतीपत्नीच एकच एक मत असल तर संसारात स्वर्ग निर्माण होतो.

                     000o000

                "  माणसाला काही ना काही छन्द हवा. स्वप्न हवीत. पूरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वतःला हरवायला शिकतो. सापडायला शिकतो. हे    हरवण - सापडणं प्रत्येकाचं निराळ असतं. पतीपत्नीच एकच एक मत असल तर संसारात स्वर्ग निर्माण होतो. पतीपत्नीच्या ह्या हरवण्या- सापडण्याच्या जागा एकच निघाल्या तर ते सुख - दुःखाचे समान वाटेकरी होतील. दोघांच्या अशा जागा किंवा स्वप्न वेगवेगळी असतील, तर प्रकृतीधर्मानुसार हे स्वाभाविक आहे, पण तो एकमेकांच्या टींगलीचा विषय होऊ नये. इतपत भान संसारात ज्यांना टिकवता येईल, त्यांना संसार सुखाचं मर्म सापडलं.  ज्यांना हे असं हरवता येत नाही, रिकाम्या वेळेचे बळी होतात. रिकामा वेळ   सैतानाचाच.

वपुर्झा /19/Surendra /07022025

" बालपण जसं परावलंबी असतं तसंच वर्धक्यहीं "

" बालपण जसं परावलंबी असतं तसंच वर्धक्यही." 

                           000o000

                "  एक मनुष्यजन्म. तोही म्हणे चौरऐशी लक्ष फेऱ्यानंतर. अर्थातं मला त्याच्याशी कर्तव्य नाही. मला दिसतो तो समोरचा जिताजागता माणूस. त्यातल्या त्यात त्याचा तारुण्याचा काळ. उत्पत्ती, स्थिती, लय, सकाळ, दुपार, संध्याकाळ. सगळा निसर्गच दादरा तालात आखलेला. बालपण, तारुण्य, वार्धक्य. जास्तीत जास्त सुख उपभोगण्याचा काळ - तारुण्य. संततीच्या रूपाने माणसाला तारुण्यात, बालपण पुन्हा अनुभवता येत, पण वार्धक्यात तारुण्य अनुभवता येत नाही. जाणिवा जाग्या झाल्या पासून प्रत्येक जण आतुरतेने वाट पहातो, ती तारुण्याची. तारुण्याचा काळ हा जसा जास्तीत जास्त सुख उपभोगण्याचा काळ आहे, तसाच तो जास्तीत जास्त कर्तृत्व दाखवण्याचा, व्यक्तिमत्व घडविण्याचा काळ आहे. बालपण जसं परावलंबी असतं तसंच वर्धक्यही. स्वतःच्या मतांचा मागोवा आणि पाठपुरावा करण्याचा अधिकार तारुण्यातच अनुभवता - उपभोगता येतो "                                       वपुर्झा /17/Surendra /07022025

" परमेश्वराची योजना निराळी असते "

" परमेश्वराची योजना निराळी असते " 

                           000o000

                "  परमेश्वराची योजना निराळी असते. आपण मर्त्य जीवांनी त्यात ढवळाढवलं केली कीं बॅलन्स जातो. तोल बिघडतो. त्याची रचना पाहा, तो तापट नवऱ्याला थंड बायको देतो, कंजूष नवऱ्याला उधळी बायको देतो.            ' भगवंता, कसली जोडीदारीण देतोस? ' म्हणून आपण त्याच्या नावाने खडे फोडतो, पण त्याची ती योजना अचूक असते. आपल्याला तो हेतू समजत नाही. मग आपण दुःखी होतो. केवळ बाह्य देखाव्यावर भुलून, कातडीचा रंग पाहून लग्न जमवतो. आर्थिक बाजू पाहतो, सौदंर्य शोधतो, शिक्षणाचा अंदाज घेतो - आणि केवळ रुपावर भाळून आयुष्यातले निर्णय घेतो. आणि म्हणूनच वैतागतो, पस्तावतो. परमेश्वराने भलतातच जोडीदार गळ्यात मारला म्हणून कातावतो.  

वपुर्झा /12/Surendra /06022025

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५

" द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजेच पुर्यषार्थ नाही "

" द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजेच पुर्यषार्थ नाही " 

                     000o000

                "  स्वप्न बाळगण्या साठी कर्तृत्व लागत असं कुणी सांगलीतले? अनेक माणसांच्या बाबतीत, ते जन्माने पुरुष आहेत, एवढा पुरुषार्थ त्यांना पुरतो. ' अर्थ असलेला पुरुष ' म्हणजे पुरुषार्थ अशी व्याख्या ते करीत नाहीत. हिरकणी योगायोगाने मिकते. ती टिकवायची असते हे ज्यानां उमगत ते ' पुरुष'  शब्दाला ' अर्थाची ' जोड देतात. कर्तृत्व नसेल तर नसेल. प्रत्येकाकडे असतं असं नाही. पण कर्तृत्व अनेक प्रकारचं असतं. द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजेच पुर्यषार्थ नाही. जोडीदारावर अमाप माया करणं, बायकोची शक्ती ओळखण, तिला सुरेख साथ देणं, तिला आपली साथ सोडावीशी नं वाटेल इतकी तिच्या कर्तृत्वाची शान सांभाळणे, हा सगळा पुरुषार्थच, क्षमाभाव, वात्सल्य हीं गुणवत्ता केवळ बायकांची माक्तेदारी नाही. 

वपुर्झा /08/Surendra /006022025

"वंचना, आत्मवंचना म्हणतात ती ह्यालाच."

"वंचना, आत्मवंचना म्हणतात ती ह्यालाच."

                           000o000

                "  अधिकाराच्या जोरावर आपण जेव्हा दुसऱ्या माणसाला गप्प करायचा प्रयत्न करतो, त्यामागे अधिकाराच्या भावनेपेक्षा भीतीची भावना मोठी असतेच, पण कदाचित निरुत्तर होऊ याची दहशत असते. ह्याचाच अर्थ सत्याची आपल्याला भीती वाटते. विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आपल्या कडे उत्तर नाही हे सत्य! त्या सत्याला आपण घाबरतो आणि मग बाजू लंगडी पडायला नको म्हणून, दुसऱ्या गोष्टीचा आधार घेऊन आपण समोरच्या माणसाचं तोंड गप्प करतो. हा मार्ग नेहमीच फसवणारा असतो. वंचना, आत्मवंचना म्हणतात ती ह्यालाच. ह्यामुळे दोन माणसं घायाळ होतात. दंडपशाहीमुळे बोलू न शकणारा आणि खुद्द दंडपशाही करणारासुद्धा. एक घायाळ झाल्याचं इतरत्र दाखवीत सुटतो, दुसरा दाखवत नाही. एवढाच फरक! पण त्यात गंमत अशी कीं, जो उघडपणे दर्शवत नाही तो कायम आतल्या आत धास्तावलेला असतो" वपुर्झा /07 /Surendra /05022025

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२५

" हीं स्वतःचीच पूजा झाली !!"

" हीं स्वतःचीच पूजा झाली !!"

                           000o000

                "  व्यवहारी माणसात, समाजात चांगल वागायचं ते केवळ वाईट दिसू नये म्हणून. म्हणजेच मूळ वृत्तीला विसरून रीत सांभाळायची. इथंच यातना आहेत. एखादाच बदल असा असतो कीं त्याचा मनाने स्वीकार केला जातो. बाकी सगळं लादलेल असत. प्रत्येक माणूस आयुष्यभर इतरांवर काही ना काही लादत असतो. प्रत्येक माणूस समोरच्या माणसाला स्वतःसारखं करण्याची धडपड करतो. जितक्या प्रमाणात समोरचा माणूस आपल्या मनाप्रमाणे वागेल तेव्हड्याच प्रमाणात तो समोरच्या माणसांवर प्रेम करतो. ह्या स्वरूपाच प्रेम करणं हे प्रेमच नाही. हीं स्वतःचीच पूजा झाली. समोरचा माणूस जसा असेल तसें स्वीकारणारे किती? "

वपुर्झा /05 /Surendra /04022025(2)

खरं तर दासबोधा नंतर मराठी साहित्यात एकही ओळ कुणी लिहिली नसती तरी चाललं असत."

" खरं तर दासबोधा नंतर मराठी साहित्यात एकही ओळ कुणी लिहिली नसती तरी चाललं असत." 

                           000o000

                "  दासबोधसारखा महान ग्रंथ, करमणूक करणारा ग्रंथ नव्हे. माणसातल्या वृत्तीतली एकही छटा तिथं निसटलेली नाही. मुंबईच्या शेअर बाजारात मध्यभागी बसून समर्थांनी सगळ्या वृत्ती टिपल्यासारख्या वाटतात. खरं तर दासबोधा नंतर मराठी साहित्यात एकही ओळ कुणी लिहिली नसती तरी चाललं असत. तरी इतकी पुस्तक निघतात. कारण अहंकार, मलाही जग समजलंय हे सांगायचा अट्टाहास. मी तरी एवढं लेखन का केल? मनाचे श्लोक वाचून गप्प बसायला हवं होत.

वपुर्झा / 04  /Surendra /04022025

" शेवटी हे प्रश्न आपल्यापर्यंत पोचतात " 000o000

" शेवटी हे प्रश्न आपल्यापर्यंत पोचतात "

                           000o000

                "  राजकीय पातळी वरचे प्रश्न आपल्या आकलनापलीकडे आहेत. शेवटी हे प्रश्न आपल्यापर्यंत पोचतात, ते वर्तमाणपत्रातून. त्यातल्या सत्यासत्यतेची तरी कुठे शाश्वती आहे? कोणतं ना कोणतं वृत्तपत्र कोणत्या ना कोणत्या पक्षाला, नाहीतर उद्योगपती्ना विकलं गेलं आहे. ते खरं तर News papers नाहीत तर Views papers आहेत. एखादा प्रचंड मोठा भ्रष्टाचार प्रथम उघडकीस आला की, तो मथळ्याचा विषय होतो. चौकशी समिती नेमून काही प्रतिष्ठितांची चार पाच महिने सोय होते. हळूहळू त्या Headlines चीं पीछेहाट होते, चौथ्या पानावर तिचा Tail piece होतो आणि रोज नव्या भ्रष्टाचारासाठी मथळ्याची जागा रिकामी ठेवावी लागते. न्यूटनच्या मूव्हमेन्टच्या तत्वाप्रमाणे आपल्या देशाची लोकसंख्याच इतकी प्रचंड आहे कीं, तिच्याच गतीने राज्य आपोआप चाललं आहे."

वपुर्झा /Surendra /03022025

शनिवार, १ फेब्रुवारी, २०२५

" आपलं कुटूंब महाभारताचा भाग नाही का?"

"आपलं कुटूंब महाभारताचा भाग नाही का?"

                           000o000

                "  आपलं कुटूंब महाभारताचा भाग नाही का? लग्न -विवाह हा एकच विषय खूप मोठा आहे. आजही देशस्थ, कोकणस्थ, कऱ्हाडे, सी. के. पी., एस. के. पी. हे भेदभाव नाहीत का? समोरची व्यक्ती हीं आपल्या सारखीच जितीजागती आणि सुशिक्षित माणूस आहे, ह्याचा कितपत विचार होतो? सौन्दर्याच्या बाबतीत प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतील, ते मी समजू शकतो. गरिबी आणि श्रीमंतीचे राक्षस अजून मध्ये येतात. परंपरा, संस्कार, मानपान, देवाणघेवाण अशा किती क्षुद्र गोष्टीभोवती आजही आपण वावरत आहोत? कशाच्या आधारावर आपण स्वतःला माणूस म्हणवून घ्यायचं?

वपुर्झा /Surendra /01022025

"प्रकाशाचा हा किरण धरून ठेवता येणं हीं इतर अनेक कलापैकी श्रेष्ठ कला, पण ती कला आहे, हेच आपल्याला ज्ञात नाही"

"प्रकाशाचा हा किरण धरून ठेवता येणं हीं इतर अनेक कलापैकी श्रेष्ठ कला, पण ती कला आहे, हेच आपल्याला ज्ञात नाही"

                           000o000

                "  अपेक्षाभंगाचा क्षण, झटका ह्यांहून वेगळा असतो का? आयुष्य आजवर किती जगलो, ह्या आकडेमोडीत काही अर्थ नाही. प्रकाश आणि अंधाराचा खेळ कॅलेंडरवरच्या चौकोनासाठी. आपल्या आयुष्याच्या वाटेवर कायम अंधारच असतो. क्षणाला क्षण घट्ट चिकटून असतांनाही पुढच्या क्षणी काय घडणार आहे, हे आपल्याला माहीत नसणं म्हणजे अंधारच नव्हे काय? जेवता - जेवता ठसका लागण, चालतांना ठेचं लागण, इतक्या किरकोळ बाबीपासून, एखाद्याने पत्नीला चहा करायला सांगणं एक कप चहा तयार व्हायच्या आत त्याने जगाचा निरोप घेणं इतक्या घटनांपर्यंत, पुढचा क्षण अद्यात असतो. अपेक्षाभंगाचा क्षण हा प्रकाशाचा किरण. आपण अंधारातून चालत आहोत, ह्याची जाणीव हा किरण करून देतो. प्रकाशाचा हा किरण धरून ठेवता येणं हीं इतर अनेक कलापैकी श्रेष्ठ कला, पण ती कला आहे, हेच आपल्याला ज्ञात नाही. म्हणूनच आपण तेवढ्यापुरते सावध होतो आणि पुन्हा अंधारातली वाटचाल चालू ठेवतो.

वपुर्झा /Surendra /01022025