" संसारात तुझा जोडीदार कसा असेल, त्याची तुला साथ मिळेल कीं नाही? ."
000o000
"कोमलतेत ताकद असते " ती ही अशी. पावसाचं पाणी तर आकाशातून पडत. माती वाहून जाते, नंद्याना पूर येतात. भलेभले खडक झिजतात. पाणी वाहतच राहतं. फुलही पाण्यासारखीच कोमल असतात. एक दगड भिरकावला तर दहा -बारा फुल खाली पडतात. ज्या दगडामुळे फुल वेचायला मिळाली तो दगड कोणी घरी आणत नाही. आपण फुलंच आणतो. ती कोमेजतात. पण एवढ्याशा आयुष्यात तुम्हाला सुगंधच देतात. फुलांचं आयुष्यच अल्प. पाण्यामध्ये सामर्थ्य कुठून येत, ह्याचा विचार केल्यास कळेल कीं त्यामागे सातत्य असत. प्रवाहात एखादा खडक आला तर पाणी त्याच्याशी झुंज देत बसत नाही, थांबत नाही, स्वतःची वाट शोधून बाजूने निधून जात. ह्या वाहण्यात सातत्य असल्यामुळेच खडक हळूहळू लहान होत जातो आणि प्रवाह रुंदावत जातो. सातत्य म्हणजे काळ. काळचं सामर्थ्य मोजता येणार नाही. अशा जबरदस्त शक्तीची साथ एवढ्याशा दिसणाऱ्या जलधारेच्या पाठीशी असते. तुझ्या संसारात तुझा जोडीदार कसा असेल, त्याची तुला साथ मिळेल कीं नाही, दोघांच्या संवेदना एकरूप होतील कीं भिन्न असतील ते सांगता येणं अशक्य आहे. लग्नाची आमंत्रणपत्रिका म्हणजे संपूर्ण संसाराच चित्र नव्हे. मंगलपत्रिकेतले शब्द वर्षानुवर्षे तसेच राहतात. त्यांचा दगड होतो. संसारातील शब्द रोज बदलत जातात. कोणतेही शब्द ऐकावे लागले तरी जर त्या स्त्रीजवळ त्या शब्दांच रूपांतर गीतात करायच सामर्थ असेल, तर तिला मी जलधाराच म्हणेन. साथीदाराला सुधारण्याच्या खटाटोपात पडू नकोस. त्याच्या दृष्टिकोनातून त्याच वागण योग्यच असत. तिथे डोके आपटत बसण्यापेक्षा त्याला वळसा देऊन पुढे जाण चांगलं. जलधारा हो. वाहत राहा.
वपूर्झा /181-182/Surendra /26112024