रविवार, २९ जून, २०२५

" पत्नी म्हणजे बासरी."

" पत्नी म्हणजे बासरी."

                               000o000

                "  पत्नी गेली की विस्व हरवतं. सूर नुसता सुरच राहतो. उरलेल्या आयुष्याचं संगीत होत नाही. सूर म्हणजे संगीताची जननी. बासरी ही नुसती भोकं असलेली बांबूची नळी असते. ओठांतून फुंकर, प्राणाचं चैतन्य देणारा गेला की बासरीचा पुन्हा बांबू झालाच. एका टोकाला कापडाचा तुकडा लावलेली ती झटकणी होते. प्रेम करणारी इतर कितीही माणसं भोवती गोळा झाली तरीही तो निव्वळ ऑर्केस्ट्रा होतो. काही काळ मनोरंजन होतं, इतकंच. पत्नी म्हणजे बासरी. त्याहीपेक्षा मी म्हणेन पुरुष म्हणजे बांबूची नळी. प्राणांची फुंकर घालून ओठाला लावणारी पत्नी गेली की नवऱ्याची झटकणीच होते. "

वपुर्झा /196/Surendra / 29062025

शनिवार, २८ जून, २०२५

" रस्त्याचे आत्मचरित्र "

" रस्त्याचे आत्मचरित्र "

                               000o000

                "  लहानपणी निबंधासाठी एक विषय ठरलेला असायचा. कोणत्यातरी निर्जीव वस्तूचं आत्मचरित्र. परवा फिरायला जातांना सहज रस्त्याला म्हटलं, ' कसं काय? ' आणि रस्ता म्हणाला, " संपूर्ण राष्ट्राच्या जीवनात रस्त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. ज्या गावाला रस्ता नाही, त्या गावाला अस्तित्व नाही. राष्ट्राची सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक प्रगती रस्त्याशिवाय अशक्य. त्यासाठी आम्ही काय काय सहन करतो? अवाडव्य वाहनांखाली आम्ही नित्य जगतो, मरतो. तुम्ही माणसं आमच्या अंगावर कुठेही गलिच्छपणे थुंकता. रस्त्याच्या दोन्ही कडांना नको ते विधी करता. तुम्हा मनावांची घाण आम्ही अंगावर तर घेतोच, पण आमच्या पोटातूनही तीच घाण सतत वाहत असते. तुम्ही रस्ते खणता, वर्षानुवर्षे दुरुस्तीच्या नावाखाली उकळतं डांबर ओतात. तुमचं पिण्याचं पाणी आणि त्याचे अजस्त्र नळ आमच्याच आतड्यातून, टेलिफोनच्या तारा आणि काय काय सांगू? अर्थातं आमचा जन्मच त्याच्यासाठी आहे. आमची जी कर्तव्य आहेत त्यापासून आम्ही मागे सरकणार नाही. आम्हाला परतीची वाट नाही. पण आता आमचं जे प्रयोजन आहे, त्यालाच धक्का लागायची वेळ आली." " म्हणजे?     "आम्हाला मोर्चाचा भार पेलत नाही." " येस. मोर्चा इस द लास्ट स्ट्रॉं ऑन द कॅमल्स बॅक. ", " आम्ही स्थिर आहोत म्हणून देश गतिमान आहे. वाहत असणं हा आमचा धर्म आहे आणि तुम्ही रस्तेच अडवता. ज्या कामासाठी आमची योजना आहै. तेच काम जर आम्हाला करू दिलं नाही तर इथे राहायचं कशाला?, चला रे. " सगळे रस्ते एकएकी जायला निघाले. मी जिवाच्या आकांताने म्हणालो, " आम्ही काय करायचं? " " संप, हरताळ, मोर्चे ह्यात आमचा जीव गेला. तुम्ही आता तुमच्या अस्तित्वासाठी.... आणि प्रगतीसाठी.... नवे रस्ते शोधा. "

वपुर्झा /136/Surendra / 28062025

शुक्रवार, २७ जून, २०२५

"कोणत्या वयाची हमी द्यायची? "

"कोणत्या वयाची हमी द्यायची? "

                                  000o000

                "  मूल पाच वर्षाचं होईतो त्याला फारसं कळत नाही म्हणून त्याला विक्षिप्त म्हणायचं. नंतर वर्षा पर्यंत.       ' वाढतं वय ' म्हणून मुलांचं वागणं सहन करायचं. नंतरच वय धड ना बाल्य, ना तारुण्य म्हणून हेकटपणाने वागायचा काळ. मग ' तारुण्याची धुंदी ' म्हणून वागणं. मग स्वभाव पक्का बनला म्हणून जो असेल तो स्वीकारायचा. असं म्हणता म्हणता ' आता एव्हड्या उशिरा, ह्या वयात त्याचा स्वभाव बदलणं कसं शक्य आहे? ' - हे म्हणण्याची पाळी येते. कोणत्या वयाची हमी द्यायची?

वपुर्झा /135/Surendra / 27062025

गुरुवार, २६ जून, २०२५

" माणूस हा किती संकेतांनी जखडला गेलेला असतो पाहा!"

" माणूस हा किती संकेतांनी जखडला गेलेला असतो पाहा!

                                  000o000

                "  ह्या अफाट चक्रावरचे आपण एक घटक. घटकलाच पूर्णचक्र समजावं ही अपेक्षाच अवास्तववादी. एका घटकाने दुसऱ्या घटकालाच जास्तीत जास्त जाणून घेण्याची धडपड करावी आणि ते करत असतानाच स्वतःच्या प्रवासाची बांधाबांध करावी. दुसरं काय? माणूस हा किती संकेतांनी जखडला गेलेला असतो पाहा! ' प्रवास ' शब्द उच्यारला की पाठोपाठ ' बांधाबांध ' हाच शब्द डोक्यात येतो. ' इथून-तिथे ' या दोन शब्दातलं अंतर जोपर्यंत' मैलात ' मोजता येतं, तोपर्यंतच बांधाबांध ह्या शब्दाला अर्थ आहे. पण जिथे मैलांचा हिशोब नाही तिथं डागांचाही नाही. एकदम ट्रॅव्हल लाईट! पण परंपरेने बांधलेले आपण, प्रवास म्हटलं की विचार सामानाचा, बरोबर काहीतरी न्यावं लागतं हेच मनावर बिंबलेलं. त्याला कोण काय करणार? पाच वर्षाच्या मुलालाही आपण छोटी पिशवी देतो आणि ' हिला सांभाळायचं ' असं सांगतो. नंतरच्या आयुष्यात मात्र आपण गळ्यात पडणाऱ्या पिशव्या कशा झटकता येतील ह्याचा विचार करीत राहतो. फार मजा वाटते. फनी वाटतं. आपला मुलगा एखादं वाक्य उलटून बोलला की संताप येतो. कारण  ' उलटून बोलायचं नसतं ' अशी एक पिशवी आपण त्याच्या गळ्यात कधीच लटकवलेली असते. अशा तऱ्हेच्या  भ्रामक, खुळचट पिशव्या आपण बाळगतो. पाप-पुण्य, नीती-अनीती, श्त्री-पुरुष सहवास, व्यसनं..... कितीतरी! अशाच कुणाला तरी आपण केव्हा केव्हा खूप दिवसांनी पाहिल्यावर विचारतोही, ' एवढे थकल्या सारखे, ओढल्यासारखे का दिसताय? त्याच्या खांद्यावरच्या पिशव्यांची त्यालाही जाणीव नसते, तो म्हणतो, ' तसा आता मी बरा आहे, पण मधून मधून एकदम थकवा येतो. थकवा कशाचा असं विचारलं तर सांगता येणार नाही. "

वपुर्झा /133/Surendra / 26062025

मंगळवार, २४ जून, २०२५

" मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते."

" मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते."

                                  000o000

                " प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरे जाण्याची एक कला असते. आयुष्य म्हणजे पुनरूक्ती. ब्रेकफास्ट, आंघोळ, दुपारचं जेवण, त्यासाठी स्वयंपाक, आलटूनपालटून त्याच भाज्या, आमटी, तीच कणिक, त्याच पोळ्या. मग एखादी डुलकी, पून्हा दुपारचा चहा. परत रात्रीचं जेवण. मग झोप. हा झाला एक दिवस. प्रति क्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती फक्त मनाजवळ असते. पण त्याला ते शिकवावं लागतं. मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते. त्याने ती उचलली की मग सगळं सोपं असतं. मग ते मनच तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकवत. ते मन मग लेखकांला कथानक पुरवत, कवीला शब्द सुचवतं, संगीतकारला चाल, नर्तकाला पदन्यास, शात्रज्ञाला शोध, साध्यासुध्या, सर्वसामान्य बाईचं आदर्श गृहिणीत रूपांतर कसं करायचं, हेही मनच शिकवतं. श्त्रीची गृहिणी होणं, ही सुद्धा कलाकृतीच आहे. "

वपुर्झा /126/Surendra / 25062025

" माणसाच्या स्वभावातली एखादी छटा म्हणजे तो संपूर्ण माणूस नाही."

" माणसाच्या स्वभावातली एखादी छटा म्हणजे तो संपूर्ण माणूस नाही."

                                  000o000

                " माझी संसाराची व्याख्याच निराळी आहे. एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी किंवा वर्मावर चोची मारण्यासाठी संसार करायचा नसतो. जिथे जोडीदार कमी पडेल तिथे आपण उभं रहायचं. मी तुला स्वीकारलं ते तुझ्या वलयासहित स्वीकारलं. माणसाच्या स्वभावातली एखादी छटा म्हणजे तो संपूर्ण माणूस नाही. एखाद्या क्षणी, एखादी भावना अनावर होते. का? ह्याचं उत्तर ज्याचं त्याच्या जवळ नसतं. भावनांचे तिढे आपण बुद्धीने सोडवायला बघतो आणि बुद्धी्वादाने कठोर प्रश्न सोडवायचे असतात, तिथं भावनेचा घोळ घालतो. ही भावनेची बुद्धीवरआणि बुद्धीची भावनेवर अवेळी पडणारी झापडच असते. झापड उडायच्या आत माणूस संसारात पडतो, आणि जाग येण्यापूर्वी संसार संपलेला असतो. "

वपुर्झा /124/Surendra / 24062025

सोमवार, २३ जून, २०२५

" ओझं दिसतं कारण ते लादलेल असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते."

" ओझं दिसतं कारण ते लादलेल असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते."                             

                                  000o000

                '  संसार ही जबाबदारी असते. त्याचं ओझं वाटायला लागलं, की आनंद संपला. ' ' जबाबदारी आणि ओझं, ह्यातला नेमका फरक काय? ' " ओझं म्हणजे खांद्यावर दिलेला बोजा. पण कधी कधी दहा-बारा हजारांचा एखादा दागिना सांभाळायचा असतो. ते इतरांनाही माहीत नसतं. त्याला जबाबदारी म्हणतात. आयुष्यात प्रेम, मैत्री, संगोपन, शुश्रुषा ह्या सगळ्या जबाबदाऱ्या. त्यांचं ओझं वाटली की सहजता गेली. " ओझं हीदेखील जबाबदारी नसते का? " " ओझं दिसतं कारण ते लादलेल असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते. ओझं बाळगणाऱ्याला कदाचित मदतीचा हात मिळतो. तसं जबाबदारीचं नसतं. "

वपुर्झा /117/Surendra / 23062025

शनिवार, २१ जून, २०२५

"ह्यातला कोणता माणूस खरा? कोणता खोटा? "

"ह्यातला कोणता माणूस खरा? कोणता खोटा?"                                   

                                  000o000

                "  मान्य करा अथवा करू नका, माणसाला सतत काही ना काही थरारून टाकणार हवं असतं. ' माणूस ' कोणतीही व्याख्या, गणित, न्यायशात्र, मानसशांत्र आणि तर्कशात्र ह्या सगळ्यातून ' निसटण्याचं शात्र ' शिकल्याप्रमाणे पळणारा वा निसटणारा प्राणी. वर्तमानपत्रातील भयानक बातमी वाचून तो थरारतो. खून, आत्महत्या म्हटलं की हळळतो. महापुराच्या बातम्या पाहून तो परमेश्वराचा उद्धार करतो. अत्याचार, बलात्कार, लाचलुचपत, खुर्चीसाठी पागल झालेले पुढारी पाहून त्याची झोप उडते. तो शिव्यांची लाखोली वाहती. आणि हाच माणूस पेपर उघल्याबरोबर जर ह्या पैकी काही सापडलं नाही तर म्हणतो, " आज पेपरमध्ये काहीच नाही ". ह्यातला कोणता माणूस खरा? कोणता खोटा? " 

वपुर्झा /113/Surendra / 22062025

" दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही."

" दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही."                                         

                                  000o000

                "  सांत्वनासाठी आजवर जगात कुणालाही शब्द सापडलेनसतील. सांत्वन म्हणजे दुःखाचं मूल. मूल आईपेक्षा मोठ कसं होईल? मूल मोठ व्हायला लागलं की आई आणखी मोठी व्हायला लागते. म्हणून, समजूत घालणारे कुणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात. हसता हसता माणूस एका क्षणात थांबू शकतो. दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही."

वपुर्झा /101/Surendra / 21062025(2)

शुक्रवार, २० जून, २०२५

" जगण्यासाठी प्रयोजन मिळालं की माणूस जगतो."

"      जगण्यासाठी प्रयोजन मिळालं की माणूस जगतो."                                               

.                                   000o000

                "   जगण्यासाठी प्रयोजन मिळालं की माणूस जगतो. तो प्रयोजन शोधत असतो. बायको, प्रेयसी, मुलबाळं, नोकरीं, पत, प्रतिष्ठा, पैंसा, वाहन, कीर्ती, मानसन्मान.... जितके डबे जोडता येतील तितके जोडायचे, व्याप वाढत गेला की बँकर्स शोधायचे. घाट संपला की जरजेपुरते जोडलेले बँकर्स सोडून द्यायचे. त्याच पळापळीत, गरज संपली आणि हौस भागली की आपल्यालाही तोडणारे भोवती असतात. पुन्हा एकाकीपण सुरु. अशा एकटेपणात ज्या माणसाकडे त्यांचं जगण्याचं प्रयोजन स्वतःच्या हातात नसतं, त्या माणसांच्या. ' ने रे पांडुरंगा ' च्या आरोळ्या सुरु होतात. " 

वपुर्झा /101/Surendra / 21062025

गुरुवार, १९ जून, २०२५

" Birds of the same feathers flock together म्हणतात, ते उगीच नाही. "

"  Birds of the same feathers flock together म्हणतात, ते उगीच नाही. "

                           000o000

                "   स्वतःची अस्मिता कधी टिकवता येते? तर मित्राच्या अस्मितेची जेव्हा सखोल जाणीव असते तेव्हा. ती जाणीव असली म्हणजे चारचोघात आपल्या मित्राशी वा मैत्रिणीच्या बाबतीत कस वागायचं, बोलायचं हे आपोआप समजतं. आयुष्यभर माणूस समानधार्मियांच्या शोधात असतो. Birds of the same feathers flock together म्हणतात, ते उगीच नाही. मैत्रीत न पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती मिळवायची असते. वेगवेगळ्या प्रसंगी आपलं वर्तन कसं होतं आणि तीच परिस्थिती मित्र कशी हाताळतो इकडे भान हवं. त्याचं चुकलं तर कान पकडण्याचा अधिकार मिळवायचा असतो आणि त्याचं बरोबर वाटलं तर अनुकरण करण्याचा मोठेपणा कमवावा लागतो. "

वपुर्झा /101/Surendra /20062025

बुधवार, १८ जून, २०२५

" माणसाचं मनं फार विचित्र असतं "

"  माणसाचं मनं फार विचित्र असतं "           

.                .     .000o000

                "   माणसाचं मनं फार विचित्र असतं. आपण एखाद्या माणसाला भेटायला जातो, तेव्हा त्या आजारी माणसाला त्याची विचारपूस केल्याचा आनंद प्रत्येक वेळी मिळतोच असं नाही. त्याच्या मनात हा भेद कायम असतो की भेटायला येणाऱ्या माणसाचं विश्व हे निराळ विश्व आहे.      धडधाकडं माणसाचं विश्व ते! आपलं आजारी माणसाचं विश्व वेगळं, हा विचार त्याला कायम सतावतो. आजारी माणूस इतरांशी चिडल्यासारखा वागतो त्याचं हेच कारण. त्या आजारी माणसाला जेव्हा त्याच्याहीपेक्षा गंभीर अवस्थेतला रोगी दिसतो तेव्हा त्याला खरं समाधान होतं. एरवी इतर    धडधाकडं माणसं व आपण ह्यांत फार मोठ अंतर पडलं आहे आणि जे काही बरे वाईट व्हायचं आहे ते आपलं होणार आहे. धडधाकडं माणसं शाबूत राहणार आहेत हया विचारांपाई तो चिडचिडा व अगतिक झालेला असतो. आणि थोड्याफार फरकाने संकटात सापडलेला माणूस हा आजारी माणसासारखाच असतो. त्याला सहानभूती नको असते. त्याला आपल्यापेक्षा मोठ्या संकटात सापडलेला माणूस पाहायला हवा असतो. आपली अवस्था इतरांपेक्षा वाईट आहे हया विचारापेक्षा आपली अवस्था आपल्याला वाटली होती तेव्हडी वाईट नाही हा विचारच त्याला तारून नेतो. "

वपुर्झा /98/Surendra / 18062025

गुरुवार, १२ जून, २०२५

" नव्या उमेदीने, मागे पाहत पाहत प्रवास चालू असतो, ठेवावा लागतो."

 " नव्या उमेदीने, मागे पाहत पाहत प्रवास चालू असतो, ठेवावा लागतो." 

                           000o000

                "   वर्तमानकाळ बोलायचा नसतोच. तो जगायचा असतो. माणसं बोलतात ती भूतकाळाबद्दल. त्यातला त्यात   दुःखाच्या हकीगती. त्याचीच उजळणी. दुःख जितकं जुनं तितकं त्याला जास्त पॉलिश. झाडाझुडपात फुलं जशी उगवतात तशी ती बघायची नाहीत. वेगवेगळ्या आकाराची भांडी आणायची. त्या भांड्यात बाणांची शय्या करायची. आणि मग कर्दळीच्या पानापुढे निशिगंधाला ताटकळत ठेवायचं, आणि आफ्रिकन लिलीच्या घोळक्यात गुलाब रोवायचे. त्या काट्यानंच्या शय्येवर फुलांना.     डुलायला लावायचं. म्हणायचं इकेवाना. तशी जुनी दुःख जास्त आकर्षक करायची. ती अनेकदा सांगून सांगून निरूपणाला नेमकेपणा आलेला असतो. त्या दुःखाचा इकेवाना करायचा. झाडं तसं करत नाहीत. फुललेल्या फुलाच्या पाकळ्या गळत असतांनाच इकडे देठाला नवा हुंकार उमटत असतो. मोठ्या आघातांसाठी माणसाच्या मनाची तयारी झालेली असते आणि तशा प्रसंगी सावरणारेही अनेक भेटतात. छोटे छोटे आघात असंख्य असतात. ते एकट्याला गाठून हताप्रभ करतात. त्यात वाटेकरी नसतात. ते एकट्याने सोसायचे! माणूस थांबतो, शिणून जातो, खचतो. पण पुन्हा सावरतो. तो शिणवटा कुणाला कळत नाही, सावरणही समजत नाही! नव्या उमेदीने, मागे पाहत पाहत प्रवास चालू असतो, ठेवावा लागतो.

वपुर्झा /96/Surendra /13062025

मंगळवार, १० जून, २०२५

" साधे प्रश्न आपण गहन करतो आणि मग जी समस्या निर्माण होते, तिचे बळी होतो. "

"  साधे प्रश्न आपण गहन करतो आणि मग जी समस्या निर्माण होते, तिचे बळी होतो. "

                          000o000

                "   आपली मुलं म्हणजे आपले खरे परीक्षक असतात. आई, वडील म्हणजेच नवरा - बायको आपण होऊन एका ठिकाकाराला जन्माला घालतात. ती मुलं परखडपणे कुणाचं चुकतं हे अचूक सांगतात. आपण त्यांना  ' तुला अक्कल नाही ' म्हणून गप्प बसवतो. " त्यांना अक्कल असते का? " नसते म्हणूनच ती खरं बोलतात. अक्कल वाढली की अहंकार वाढतो. आडमुठेपणा रक्तात वाहतो. खरं आणि खोटं ह्यांत जे सूक्ष्म अंतर आहे तिचं मतलब साठू लागतो. पुढे त्यात स्वार्थाची भर पडते. मुलांनामग कुणाची बाजू घ्यायची ते कळायला लागतं. मुलं सबजेक्टिव्हली बोलत नाहीत. ऑब्जेक्टिव्हली बोलतात. हयाउलट आपणस सबजेक्टिव्हली जगतो. " आपण कसे जगतो ह्याचाच पत्ता लागत नाही. आपण सगळे ' डिप्लोमॅटिक ' कडून ' ऑटोमॅटिक 'कडे दौड करीत आहोत. आपल्यातला माणूस झपाट्याने नाहीसा होत आहे. साधे प्रश्न आपण गहन करतो आणि मग जी समस्या निर्माण होते, तिचे बळी होतो. डिप्लोमॅटिकली प्रश्न विचारले की ऑटोमॅटिकली उत्तरं मिळतील ह्या भ्रमात आपण वावरतो. मुलांचा उपयोग मग  ' साथीदारा ' ऐवजी आपण                ' साक्षीदारा ' सारखा करतो. मुलंही मग ' कल ' पाहून बोलायला शिकतात " चार अपशब्दांपेक्षा अनावश्यक - अनुकंपा ही कोणत्याही धारदार शस्त्र्यापेक्षा जास्त तीक्ष्ण असते.                   

 "वपुर्झा /97/Surendra / 11062025

" अनेक घरातून स्वत:चेच नातेवाईक सांगूनसुद्धा ऐकत नाहीत. असं का घडत असावं?

 " अनेक घरातून स्वत:चेच नातेवाईक सांगूनसुद्धा ऐकत नाहीत. असं का घडत असावं?

                           000o000

                "  लोकशाही तत्व म्हणून ठीक आहे. पण देशाचा कारभार करायचा म्हणजे शिस्तीचा बडगा हवाच. जिथे संस्कारच नसतात तिथे बडगाच हवा. आपल्या स्वतःच्या घरात ज्यांना आपण रक्ताचे नातेवाईकमानतो तिथेसूद्धा काही गोष्टी मनासारख्या व्हायला हव्या असतील तर, घर चालवणाऱ्या माणसाला अधूनमधून रुद्रावतार धारण करावाच लागतो. आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला किंवा आईवडिलांना आपण अमुक तऱ्हेने वागलो तर आनंद होणार आहे, गैरसोय होणार नाही, ह्या समजुतीने वागणारी माणसं फार थोडी. अनेक घरातून स्वत:चेच नातेवाईक सांगूनसुद्धा ऐकत नाहीत. असं का घडत असावं? आणि तेही स्वतःच्याच माणसांकडून? कारण झोॅंडगिरीने वागलं तरी ते खपवून घेतलं जातं ह्याची खात्री आहे म्हणून. ह्याच वृत्तीने देशातली माणसं वागतात. "

वपुर्झा /223/Surendra /10062025

सोमवार, ९ जून, २०२५

" कदाचित तुझं अस्तित्व तुझ्या हयातितच संपल्याच तुला पाहावं लागेल."

"  कदाचित तुझं अस्तित्व तुझ्या हयातितच संपल्याच तुला पाहावं लागेल."

                          000o000

                "   कथाकथनाचा कार्यक्रम संपल्यावरचे क्षण कसे असतात? हे आयुष्यातले शून्य क्षण, मुक्त क्षण नव्हेत. शून्यातून सगळं निर्माण झालं म्हणतात. पण हे निर्मितीक्षम शून्य नव्हे, हे तुम्हाला उजाड, एकाकी, पोरक करणार शून्य. तुमच्यावर जिवाभावाने, उत्कटतेने तुटून पडणार कुणीतरी सानिध्यात असणं ही त्या शून्याची गरज. त्याने बोलू नये, काही सांगू नये, काही विचारू नये. स्तुती नको, कार्यक्रमाचं कौतुक नको, त्याने फक्त असावं. त्या शून्य मन:स्थितीत पुन्हा कार्यक्रम सुरु झालेला असतो. उणिवांचा मागोवा घेत उलट्या प्रवासाचा आरंभ असतो. कधी कधी काहींच नसतं. आपण फक्त असतो. कधी कधी हे क्षण चिरंतन स्वरूपाचे पण स्वतःचीच साधना नसल्या मुळे, उत्तरं हरवलेले प्रश्न सामोरं उभे करतात. हे सगळं काय आहे?, का आहे?, कधी सुरु झालं?, कधी संपणार?, मागं काय उरणार?, किती काळ उरणार?, वरवरची उत्तरं तयार असतात. हे सगळं काय आहे ह्याचं आकलन तुला होणार नाही. तू गप्प राहा. का आहे? - सांगता येणार नाही. कारण तू ह्याचा निर्माता नाहीस. हे कधी सुरु झालं? - तुझ्या जन्मापासून हे सुरु झालं. महापालिकेच्या पिवळ्या कागदावर तुझी जी जन्मतारीख आहे, तो जन्म नव्हे, ती केवळ तू कायद्याने  ' सज्ञान ' कधी झालास ह्याच्या तपासणी साठी किंवा उलटतपासणीसाठी आवश्यक असलेली नोंद. त्यातला ' सज्ञान ' हा शब्द संपूर्ण अज्ञान दर्शवणारा. कॅलेंडरवरचे छापील चौकोन मागे पडल्याने माणूस सज्ञान होतो काय?. ज्या दिवशी तुझ्या जाणिवांचा प्रारंभ झाला तो तुझा जन्म. तो दिवस टिपता येईल?- नो.नेमक्या कोणत्या दिवशी गर्भ राहिला हेही सांगता येत नाही. तरीही समज, जाणिवा जाग्या झाल्या त्या दिवसापासून हे चक्र फिरू लागलं. कधी संपणार?- तुझ्या शेवटच्या श्वासाबरोबर. मागं काय उरणार?- काही नाही. तुझ्या पश्चात तुझं अस्तित्व किती? इतरांच्या जाणिवा जितके दिवस राहतील तितके दिवस. कदाचित तुझं अस्तित्व तुझ्या हयातितच संपल्याच तुला पाहावं लागेल. 

"वपुर्झा /222/Surendra / 10062025

शनिवार, ७ जून, २०२५

' कुठे शोधशी रामेश्वर अन!कुठे शोधिशी काशी!'

 ' कुठे शोधशी रामेश्वर अन!कुठे शोधिशी काशी!' .          000o000.    

   "  आपल्याला स्वतःला एखाद निरपेक्ष काम करतांना, अंतरंगातून शांतीचे झरे वाहत आहेत किंवा निःस्वार्थीपणाने कुणासाठीही कोणतंही काम करतांना किंवा ' श्रेयस ' आणि ' प्रेयस ' ह्यांत स्वतचं काही ना काही प्रमाणात नुकसान होत असतांनासुद्धा तटस्थपणे श्रेयसची निवड करता आली, म्हणजे आपण आपले गुरु होतो. ह्याचाच अर्थ गुरुचं वास्तव्य आपल्यातच चोवीस तास असतं. आपल्याला त्याचं भान नसतं किंवा भान असूनही आपण ' प्रेयस ' ला प्राधान्य दिलं की गुरुत्वापासून लांब जातो. कोणतीही कृती करत असतांना आपण ती का करीत आहोत, त्यात जिव्हाळा किती, नाटक किती, उमाळा किती आणि नाईलाजास्तवता किती, समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी किती आणि शुद्ध सात्विक भाव किती, हे ज्याचं त्याला माहीत असतं. अशा अनेक प्रसंगी  स्वतःचं स्वतःला होत, ते ज्ञान! ' ज्ञान म्हणजेच गुरु ' ज्याची व्याख्या करता येते, त्याला       ' माहिती ' म्हणतात. ' परमात्मा तुमच्यातच आहे' असं म्हणतात.  ' कुठे शोधशी रामेश्वर अन!कुठे शोधिशी काशी!'  ह्या कवितेत पाडगावकरांनी  ' हृदयातल्या उपाशी राहिलेल्या परमेश्वरावर  ' अचूक बोट ठेवलेलं आहे. मग जसा परमात्मा बाहेर शोधायचा नसतो, तसा गुरुही! असं जर असेल तर मी स्वतः कायम गुरुपदावर का राहू शकत नाही? संभ्रम आणि द्वंद्व हेच ह्याचं कारण!

 वपुर्झा /183/Surendra /07062025

शुक्रवार, ६ जून, २०२५

"माणूस जेवढा जवळचा, तेवढा त्याचा बाण जास्त जहरी. "

"माणूस जेवढा जवळचा, तेवढा त्याचा बाण जास्त जहरी. "

                          000o000

                "   हत्या करण्यासाठी कागदी बाणही चालतो, नव्हे, तोच जास्त विषारी असतो. वाग्बाणासारखा. धनुष्यावरचा बाण तुम्हाला कायमची चिरनिद्रा देऊन तुम्हाला मुक्त करतो. वाग्बाण निद्रा घालवतो आणि तुमच्या स्मृती जितकी वर्ष टवटवीत राहतील, तितकी वर्ष तुमची हत्या करीत राहतो. माणूस जेवढा जवळचा, तेवढा त्याचा बाण जास्त जहरी. "

वपुर्झा /183/Surendra / 06062025(2)

" मैलाच्या दगडापाशी ' सब घोडे बारा टक्के'. "

"  मैलाच्या दगडापाशी ' सब घोडे बारा टक्के'. " 

                          000o000

                "  समोरच्या माणसाचं मार्गदर्शन हे तुम्हाला हव्या असलेल्या किंवा पेलणाऱ्या रस्त्याच मार्गदर्शन नव्हे. तो स्वतः ज्या मार्गांवरून चालत आलेला आहे, त्यातून त्याने काढलेला तो निष्कर्ष आहे. म्हणूनच मला वाटतं, मार्गदर्शन हा प्रकार खऱ्या अर्थानें संभवतच नाही. आपल्या वृत्ती वेगळ्या, आयुष्य वेगळं, पूर्वानुभव वेगळे, समस्या वेगळ्या. मग त्यांची उत्तरं दुसऱ्याजवळ कशी असतील? चार रस्त्यापैकी बडोद्याला जाणारा रस्ता कोणता, हे दर्शविणारा बाण आणि खालचा मैलाचा आकडा हेच खरे मार्गदर्शक. इथं तुमच्या वृत्तीचा, अहंकाराचा, आज्ञानाचा प्रश्न येत नाही. हया रस्त्याऐवजी दुसरा रस्ता बडोद्याला का जातं नाही? हाही प्रश्न विचारता येत नाही आणि परीक्षेत जसे मार्क्स वाढवून मिळतात, तसें इथे मैल कमी करता येत नाहीत. मैलाच्या दगडापाशी ' सब घोडे बारा टक्के'. " 

वपुर्झा /182/Surendra / 06062025

मंगळवार, ३ जून, २०२५

' लग्नाची आमंत्रणपत्रिका म्हणजे संपूर्ण संसाराच चित्र नव्हे. "

 ' लग्नाची आमंत्रणपत्रिका म्हणजे संपूर्ण संसाराच चित्र नव्हे. "

                           000o000

                " कोमलतेत ताकद असते ती ही अशी. पावसाचं पाणी तर आकाशातून पडतं. माती वाहून जाते, नद्यांना पूर येतात, भलेभले खडक झिजतात. पाणी वाहतच राहते. फुलही पाण्यासारखीच कोमल असतात. एक दगड भिरकावला तर दहा  - बारा फुलं खाली पडतात. ज्या दगडामुळे फुलं वेचायला मिळाली तो दगड कोणी घरी आणत नाही. आपण फुलंच आणतो. ती कोंमजतात. पण              ऐवढ्याश्या आयुष्यात तुम्हाला सुगंधच देतात. फुलांचं आयुष्यच अल्प. पाण्यामध्ये सामर्थ्य कुठून येत, ह्याचा विचार केला तर कळेल की त्यामागे सातत्य असतं. प्रवाहात एखादा खडक आला तर पाणी त्याच्याशी झुंज देत बसत नाही, थांबत नाही, स्वतःची वाट शोधून बाजूने निघून जातं. ह्या वाहण्याला सातत्य असल्यामुळेच खडक हळूहळू लहान होत जातो आणि प्रवाह रुंदावत जातो. सातत्य म्हणजे काळ. काळचं सामर्थ्य मोजता येणार नाही. अशा जबरदस्त शक्तीची साथ एवढ्याश्या दिसणाऱ्या जलधारेच्या पाठीशी असते. संसारात जोडीदार कसा असेल, त्याची साथ मिळेल की नाही, दोघांच्या संवेदना एकरूप होतील की भिन्न असतील ते सांगता येणं अशक्य आहे. लग्नाची आमंत्रणपत्रिका म्हणजे संपूर्ण संसाराच चित्र नव्हे.         मंगलंपत्रिकेतले शब्द वर्षानुवर्षे तसेच राहतात. त्यांचा दगड होतो, म्हटले तरी चालेल. संसारातले शब्द रोज बदलत जातात. कोणतेही शब्द ऐकावे लागले तरी जर त्या           स्त्रीजवळ त्या शब्दाच रूपांतर गीतात करायचं सामर्थ असेल, तर ती एक जलधाराच. साथीदाराला सुधारण्याच्या खटाटोप नको. त्याच्या दृष्टिकोनातून त्याचं वागणं योग्यच असतं. तिथे डोकं आपटत बसण्यापेक्षा त्याला वळसा देऊन पुढे जाणं चांगलं. "

वपुर्झा /181/Surendra /03062025

रविवार, १ जून, २०२५

" माणूस असाच आयुष्यभर एकटाच असतो."

"  माणूस असाच आयुष्यभर एकटाच असतो."

                          000o000

                "  समस्या नावाची वस्तूच अस्तित्वात नसते. एक विशिष्ट परिथिती निर्माण होते आणि माणसाने तारतम्याने वागायचं असतं. त्याचप्रमाणे एक माणूस दुसऱ्या माणसाच्या संदर्भात एका ठराविक मर्यादेपर्यंत विचार करू शकतो किंवा मदत करू शकतो. म्हणून एव्हड्यासाठीच कुणालाही बदलण्याच्या खटाटोपात माणसाने पडू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होऊ नये. दुसऱ्याचे प्रश्न सोडवतांना तुम्ही त्याची बुद्धी वापरून, त्या समस्येंकडे कधीच बघू शकत नाही. तुम्ही तुमचाच तराजू वापरता. माणूस असाच आयुष्यभर एकटाच असतो. दोन मुलांपैकी एका मुलाला आमटी तिखट लागते आणि दुसऱ्याला सौम्य वाटते, हे चूक की बरोबर कुणी ठरवायचं? ".

वपुर्झा /180/Surendra / 01062025