" प्रेम आणि लग्न " वपूर्झा /200/Surendra /14112024(3)
कुणावर तरी प्रेम बसणं. त्यानंतर मनात निर्माण होणारी हुरहूर, त्या पाठोपाठ काहूर ह्या सगळ्या अवस्था डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. लग्नाला एकच दिशा असते, प्रेमाला अनेक. लग्न केल म्हणजे एकमेकात प्रेम निर्माण होईल ह्या चुकीच्या धारणेवरच समाज उभा आहे. प्रेम हे आकाशाइतकं उत्तुंग आणि विशाल आहे, तर लग्नासंस्था जमिनीला घट्ट धरून उभी आहे. म्हणूनच लग्नानंतर प्रेमाचं नातं निर्माण झालं नाही तर पायाखालची जमीन सरकायला लागते. नैसर्गिक धरणीकंप अधूनमधून होतात, अनेक घराघरातून होणाऱ्या धरणीकंपाची नोंद कुठल्याही वेधशाळेत घेतली जात नाही. त्या जमिनी तिथल्या तिथेच थरथरत राहतात. प्रेम निसर्गाने निर्माण केलंय आणि लग्नसंस्था समाजाने. म्हणूनच अनेक भगिनींच्या पायात समाजाने घातलेल्या बेड्या त्यांना गळ्यात मंगळसूत्र म्हणून बाळगाव्या लागतात. पायातल्याबेड्या थेट गळ्यापर्यंत आल्यावर, न आवडणाऱ्या साथीदाराबरोबर संसार करतांना प्राण कंठाशी का येणार नाहीत? काही काही घरातून ह्या मंगळसूत्राचे गळफास होतात.पण " मरेपर्यंत फाशी " अशी मुक्ती मिळत नाही. प्रेमातून संसार फुलला पाहिजे, त्याऐवजी संसारातून मुलांची पैदास होते आणि त्यालाच आम्ही प्रेम समजून कवटाळत राहतो. प्रेम ही चैतन्याची खूण आहे. ते फुलत आणि वरमाला बनवावी लागते. म्हणून केवळ अंतरपाट दूर केल्याने अंतर मनाचं मिलन होईल ह्याची शास्वती नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा