रविवार, २० एप्रिल, २०२५

" ह्या सर्व धडपडीतून चालतो तो पूर्णत्वाचा वेध."

"  ह्या सर्व धडपडीतून चालतो तो पूर्णत्वाचा वेध."

                          000o000

                "  आयुष्यात, संसारात ज्यांना काहीही घडलेलं चालतं, त्यांच्यासमोर काही समस्या नसतात. कॉफी कीं चहा इतक्या साध्या, ऐहिक गोष्टीपासून ज्या माणसांना विशिष्ट गरजा आहेत, आवडनिवड आहे, त्यांच्या समस्या रोज जाग आल्यापासून सुरु होतात. त्यात पुढे मग दुधाचं प्रमाण किती, टॅम्परेचर किती, ब्रँड कोणता.... एक न संपणारी किंवा कुठून सुरु झाली, ह्याचा पत्ता लागू न देणारी मुंग्याची रांग. ही रांग जेव्हा वैचारिक भूमिकेपर्यंत जाऊन पोचते आणि अग्रहक्क मागू लागते तेव्हा डोक्याचं वारूळ झाल्यास नवल काय? विचारांचा शोध विचारच घेत राहतात. जोपर्यंत स्वतःच्या वृत्तीचा शोध स्वतःलाच लागलेला नसतो तोपर्यंत ठीक चाललेलं असतं. सगळ्यांचच. तो शोध संपला, नक्की काय हवं होत ह्याचा शोध लागला कीं समानधर्मीयांचा शोध सुरु होतो. कारण स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा, निश्चित गरजांचा पत्ता लागला म्हणजेच संवादाची भूक वाढत जाते. ' गरजा ' आणि ' व्यक्तिमत्व ' हे शब्द खूप ढोबळ आहेत आणि काटेकोरसुद्धा. ' काही तरी हवं असणं' असं साधेपणाने म्हणता येईल. स्वतःचं स्वतःला सावडणं हे महत्वाचं. कोणत्याही गरजा कमी लेखायचं कारण नाही. स्वतःचा पत्ता स्वतःला सापडला म्हणजे मग वायफळ शब्दांनी भरलेला संवाद खपत नाही. शब्दही नेमके हवे असतात. नेमकेपणाला सगळंच ' नेमक' लागतं. हा अभिप्रेत असलेला नेमकेपणा कधी एकाच व्यक्तीत एकवटलेला गवसतो. कधी तो विखूरलेला आढळतो. निरनिराळ्या व्यक्ती निरनिराळ्या कारणांसाठी आवडतात आणि म्हणूनच प्रत्येकाशी जुळणारे संवादही वेगवेगळे असतात. ह्या सर्व धडपडीतून चालतो तो पूर्णत्वाचा वेध. ते स्थळ सापडलं कीं माणसं तिथं स्थिरावतात. "

वपुर्झा /152/Surendra / 20042025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा