गुरुवार, ३ एप्रिल, २०२५

" जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म."

"  जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म."

                           000o000

                "  जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म. आयुष्य एक सातारीसारखं वाद्य आहे. ती सतार वाजवण्याचं सामर्थ्य आणि कला अवगत करून घेणं, हाच धर्म. तो धर्म समजला तर छोट्या बिजातून प्रचंड वृक्ष जन्माला येतो.  त्यावर पक्षी येऊन बसतात. गातात. त्यांचे संसार बहरतात. पैशाशिवाय. पक्षांचं धन वेगळंच असतं. गाणं हेच त्यांचं आयुष्यभराचं कार्य. पक्षी पिल्लांसाठी घरं बांधतात. स्वतः वळचणीखाली राहतात. मला सांगा, एकातरी पक्षाची हाउसिंग सोसायटी आहे का? तसं असतं तर झाडाझाडांवर अनेक अनधिकृत कॉलनीज दिसल्या असत्या. पाखरं घरं बांधतात पिल्लांसाठी. पिल्लाला मुक्त आकाश खुलं झालं की घर आपणहोऊन काटक्या टाकतं. म्हणून झाडंही नोटीसा पाठवत नाहीत. मनाचा हा मोठेपणा झाडं जमिनीपासून शिकतात आणि पावसाचा वर्षाव करून आकाश जमिनीवर प्रेमाचा अभिषेक करतं. सृष्टीतल हे नातं ओळखता आलं की सतार योग्य हातात पडली, असं समजावं. हाच धर्म.

वपुर्झा /151/Surendra / 03042025

मंगळवार, १ एप्रिल, २०२५

पाकिटावर स्वतःचं नाव न घालता आहेर करणाऱ्या आप्तांसारखी असतात "

" पाकिटावर स्वतःचं नाव न घालता आहेर करणाऱ्या आप्तांसारखी असतात "

                           000o000

                "  आयुष्याचं पुस्तक वाचायला निराळाच इंद्रिय लागतं. सरकारने मंजुरी दिलेल्या पुस्तकापेक्षा हे पुस्तक खूपच निराळं. ह्या पुस्तकाची भाषा ही लिपी नसलेली भाषा आहे. म्हणूनच पुस्तकाचं वाचन करणाऱ्या माणसाला डिग्री नाही. आयुष्याचं पुस्तक वाचणारा माणूस ओळखायचा कसा? कधी? तर तो माणूस अर्थपूर्ण हसतो तेव्हा ओळखायचा. ' मी अडाणी माणूस आहे ' ह्यासारख्या वाक्यातून अशा माणसाची विद्वत्ता बाहेर पडते. नम्रतेचा पोशाख घालून चातुर्य जेव्हा प्रकट व्हायला लागतं, तेव्हा या माणसांची युनिव्हर्सिटी शोधायची नसते. ही माणसंच निराळी. चार बुके शिकलेल्या माणसांना आपली हुशारी, आपलं ज्ञान, विद्वत्ता, रुखवतासारखी कधी मांडून ठेऊ असं होत आणि ही माणसं कशी असतात? पाकिटावर स्वतःचं नाव न घालता आहेर करणाऱ्या आप्तांसारखी असतात."

वपुर्झा /148/Surendra /02042025

" अनेक ज्ञात -अज्ञात सारथ्यांच्या हातात आपल्या संसाराचे अनंत लगाम असतात."

"  अनेक ज्ञात -अज्ञात सारथ्यांच्या हातात आपल्या संसाराचे अनंत लगाम असतात."

                           000o000

                "  कुवतीनुसार कलावंतांसाठी जे जे करता येईल, ते ते करण्यासाठी समाजातील छोटी माणसं फार झटतात. खरं तर छोटी माणसं, मोठी माणसं असं काही असतच नाही. संपूर्ण रामरक्षा मोठी की नुसतं ' राम ' हे नाव मोठ? प्रपंच करणारा जीव व्यवहारावरच जगतो. निर्माण केलेल्या वस्तुने आणि नेमलेल्या माणसाने सांगितलेले काम करायला हवं. प्रत्येकजण म्हणून त्याच्या त्याच्या कार्यक्षेत्रातला सम्राट असतो. वाफेतली ताकद ओळखून इंजिनाचा शोध लावणारा 

वॅट मोठा, हे कोण नाकारून? पण आपण ज्या गाडीने प्रवास करणार असतो त्या गाडीचा ड्रायव्हर वॅटपेक्षा मोठा असतो. योग्य वेळी योग्य ड्रायव्हर भेटल्याशिवाय संसाराचा गाडा चालत नाही. आपण आपला संसार चालवतो असं रुबाबात म्हणण्यात काही अर्थ नाही. अनेक ज्ञात -अज्ञात सारथ्यांच्या हातात आपल्या संसाराचे अनंत लगाम असतात. फक्त दुसऱ्या माणसांसाठी नियमांवर बोट ठेवणाऱ्या आडमुठ्या ड्रायव्हर्सपायी आपली साधी साधी कामं कशी रखडतात, हे आठवून पहावं, आणि अचानक एखादा असाच सारथी लाभल्यामुळे रेंगाळलेली कामं कशी हां हां म्हणता झाली आहेत, ह्याचंही स्मरण ठेवावं." 

वपुर्झा /147/Surendra / 01042025