शनिवार, २१ जानेवारी, २०२३

मराठी: पुनर्जन्म : अशोक कुलकर्णी . कॉलेक्सन: सुरेंद्र पाथरकर

पुनर्जन्म
<><><><><><><><><><><>
नको मोक्ष मज नकोच मुक्ती
पुन्हाच मानव जन्म हवा
या जन्मी जे राहून गेले
भोगाया ते जन्म हवा

कधी न पुसले अश्रू कुणाचे
हासू न कोण्या ओठी आणले
प्रवाहात ना कधी पोहलो
काठावरती जीणे टांगले

शब्दांचे घट भरता-भरता
शब्दच अवघे जीवन झाले
तरी उपेक्षित जीणेच जगलो
यश शिखराचे कधी न पाहिले

योग्य पुत्र ना योग्य पति मी
योग्य बंधु ना योग्य सखा मी
अपूर्णतेचा शाप शिरावर
जीवन अवघे जळत राहिले

पुण्य न इतके कधी साठले
पापाचे ना टोक गाठले
जन्म-मृत्यूच्या फे-यामधुनी
सुटण्याचे मी दोर कापले

जगायचे जे राहून गेले
जगावया ते जन्म हवा
मोक्ष-मुक्ती ती नकोच मजला
पुन्हाच मानव जन्म हवा

: अशोक कुळकर्णी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा