अमित,
*अरे बाबा उठले नाहीत का अजून?* औषधांची वेळ चुकली की मग सगळं तंत्रच बिघडतं रे त्यांचं!
*अमित, जरा बघतोस का खोलीत जाऊन त्यांच्या*? माझ्या पोळ्या चालल्यात भाजी ठेवलीय गॅस वर! तुझा डबा भरायचाय अजून!
उठल्या उठल्या चहा लागतो त्यांना आणि तोही सकाळी सातच्या ठोक्याला, पावणे आठ होत आले, आज चहा चहा करत किचन मध्ये आले नाहीत!
अदितीचं बोलणं ऐकताच अमितलाही आश्चर्यच वाटलं, बाबा अजून उठले कसे नाहीत? तो लगेचच उठून त्यांच्या खोलीत गेला, *बाबा अजून झोपलेलेच होते*.
बाबा उठा.. आठ वाजत आले! आज चहा नकोय वाटतं?
काही प्रतिसाद नाही म्हणून अमित त्यांना हलवून उठवू लागला तर प्रतिसाद न देणार *बाबांचं थंडगार पडलेलं शरीर बघताच तो जोरात ओरडलाच* , अदितीsss आगं इकडे येss हे बघ बाबा उठत नाहीयेत!
पोळपाटावर लाटत असलेली पोळी आणि तव्यावरची भाजत ठेवलेली पोळी तशीच अर्धवट ठेऊन *गॅस बंद करून अदिती धावत बाबांच्या खोलीत पळाली*.
अमितला काही सुचनासं झालं होतं. अदितीs बाबा उठत नाहीयेत! अदीतीही घाबरून गेली आणि बाबांना हलवत उठवू पाहत होती. बाबा उठत नाहीयेत! अदितीच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. स्वतःला सावरत ती अमितला म्हणाली अरे औषधांमुळे गाढ झोप लागली असेल थांब मी डॉक्टरांना फोन करते.
अदितीने बाबांच्या नेहमीच्या डॉक्टरांना फोन लावला
हॅलो डॉक्टर, मी गीता बोलतेय
हो हो बोल.. *बाबा बरे आहेत ना?परवाच येऊन चेक करून गेलो*. बी पी वाढलेलं होतं पण औषधं बदलून दिली आहेत.
अदिती : डॉक्टर *बाबा उठतच नाहीयेत* . बहुतेक... तुम्ही याल का घरी लगेच?
डॉक्टर : हो हो येतो मी लगेचच.
डॉक्टर पुढच्या दहा मिनिटात घरी पोहोचले. अमितच्या पाठीवर थोपटत म्हणाले *पहाटेच गेलेत ते, बी पी शूट झालं असावं*. मी डेथ *सर्टिफिकेट* लिहून देतो.
डॉक्टरांचं बोलणं ऐकून अदिती *ढसाढस रडू लागली*.
डॉक्टर तिला म्हणाले गीताss *जन्म मरण आपल्या हातात थोडी असतं* आणि वय ही झालंच होतं ना त्यांचं? काहीतरी निमित्त व्हायचंच.
अमित कडे पहात ते म्हणाले मी तर म्हणेन सुटले ते बरं झालं नाहीतर *अल्झायमर सारख्या आजारात पुढे खूप त्रास सहन करावा लागतो पेशंट आणि त्याच्या नातेवाईकांना* देखील...
*डेथ सर्टिफिकेट* वर त्यांचं नाव काय लिहायचं? *मी त्यांना तपासायला यायचो तेव्हा तुमचं ऐकून ऐकून बाबाच म्हणायचो नेहमी*. गीताचे बाबा म्हणूनच मी ओळखतो यांना.
अदिती आणि अमित दोघेही थोडे गोंधळून गेले..
अदिती त्यांना म्हणाली डॉक्टरss माझं नाव गीता नाहीये माझं नाव अदिती!
*गेल्या दहा वर्षांपासून मी गीता झाले होते बाबांची!*
डॉक्टर: म्हणजे?
डॉक्टर, दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे! मी मंडईत भाजी आणायला गेले होते, भाजी घेऊन बाहेर पडले आणि रिक्षाला हात करत उभी होते. तितक्यात *गीताss गीताss म्हणून मागून हाक आली आणि एक आजोबा माझ्याजवळ येऊन माझा हात धरून म्हणायला लागले* , गीता ss अगं मला घर सापडत नाहीये आपलं! केव्हाचा मी इथे थांबलोय पण कुठे जायचं कळत नाहीये. बरं झालं तू आलीस चल घरी जाऊ.
*आजोबा चांगल्या घरातले वाटत होते*, दिसायलाही आणि त्याच्या कपड्यांवरूनही. माझा हात धरून म्हणायला लागले गीता sss चल लवकर मला भूक लागलीय कधीची?
काय करावं मला सुचेना!
*आजोबांचं केविलवाणं बोलणं ऐकून* वाटलं घरी घेऊन जावं याना काहीतरी खायला द्यावं आणि सावकाश त्यांना त्यांचा पत्ता विचारून घरी सोडावं. रिक्षा पकडून आम्ही दोघं घरी आलो.
पोहोचताच आजोबा ओरडायला लागले "गीताsss आमटी भात वाढ गं लवकर खूप भूक लागलीय"
घाईने त्यांना जेवायला वाढलं. *बऱ्याच दिवसांचे उपाशी असल्या सारखे ते जेवत होते*. पोटभर जेवून झाल्यावर त्यांना विचारलं , *आजोबा कुठे राहता तुम्ही?* आठवतंय का? मी सोडते तुम्हाला तुमच्या घरी!
त्यावर त्यांचं उत्तर , गीता हेच तर घर आहे ना आपलं? मला कांही सुचत नव्हतं! आजोबा जेवण झाल्यावर बाहेर सोफ्यावर झोपून गेले.
संध्याकाळी अमित घरी आला तेव्हा त्याला हा प्रकार सांगितला तेव्हा *तो म्हणाला आपण शोध घेऊ त्यांचा घराचा पत्ता आणि नातेवाईकांचा*. बातम्यांमध्ये , पेपरमध्ये कोणती मिसिंग कंपलेंट आहे का दोन तीन दिवस चेक करत होतो. पोलीस चौकीत कळवलं! *पोलिसांचं म्हणणं पडलं काही शोध लागला तर कळवू तोपर्यंत तुमच्याकडे राहूदे त्यांना*.
तुम्हाला अडचण वाटत असेल तर त्यांची सोय सरकारी वृद्धाश्रमात किंवा दवाखान्यात करू.
दोन दिवस गीता गीता म्हणत माझ्या मागे मागे करत होते अगदी. गीता आज भेंडीची भाजी कर, लसणाची फोडणी देऊन कढी कर आशा फर्माईशी करत होते.
त्यांच्याकडे पाहून मला खूप वाईट वाटत होतं, भरून येत होतं पण आजोबांचं ते आपुलकीचं हक्काचं बोलणं आवडायलाही लागलं.
आठवडा झाला आजोबांच्या घराचा, माणसांचा काही शोध लागला नाही.
*घरात असलेल्या अशा मोठ्या माणसाचा आम्हालाही आधार वाटू लागला* . त्यांचं करावं लागतं होतं त्यात आनंदच वाटू लागला. त्यांची काही मदत न होवो पण त्यांचं अस्तित्व आमचा आधार बनू पहात होतं...
मी आणि अमितने निर्णय घेतला *आजोबांना आपण इथेच ठेऊन घेऊ*. पोलिसांना तशी कल्पना देऊन ठेवली होतीच. तेव्हापासून ते आमचे बाबा झाले.
आज *दहा वर्ष झाली त्या गोष्टीला! माझं दुसऱ्यांदा नामकरण झालं* गीता!
आज बाबांबरोबर गीताचंही अस्तित्व संपलं!
अदितीचं बोलणं ऐकून डॉक्टर निःशब्द झाले थोड्यावेळ! मला *जरासुद्धा कल्पना आली नाही कधी की हे तुमचे वडील नसून* कोणी परके आहेत! *खरंतर अल्झायमर हा आजार फार गंभीर आहे* आणि आजकाल बऱ्याच वृद्धांना याने ग्रासलं जात आहे ही फार मोठी समस्या होत चाललीय.
*आजकाल पोटच्या मुलांना धडधाकट आई वडील नको झालेत*, पैसे प्रॉपर्टी गिळंकृत करून *म्हाताऱ्या आई वडिलांची जवाबदारी टाळली जाते*. दिवसेंदिवस वृद्धाश्रम वाढत चालले आहेत. पण अशीही माणसं आहेत जगात! याचं आश्चर्य वाटतंय मला.
अश्रू अनावर झालेल्या अदिती आणि अमितच्या पाठीवर हात फिरवून, *डेथ सर्टिफिकेट देऊन डॉक्टरही पाणावलेल्या डोळ्यांनी तिथून बाहेर पडले*.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा