एका व्हाट्सप ग्रुपवरून साभार. लेखक अज्ञात.
*
पद,पैसा,प्रतिष्ठा,प्रसिध्दी
लोळण घेतात पायात
बिल गेटची पत्नी तरीही
का घटस्फोट घेते ह्या वयात ?
शिक्षणाने माणूस समृध्द होतो
आम्ही आहोत अजूनही भ्रमात
उच्चविद्याविभूषकांचे मायबाप
मग का असतात वृध्दाश्रमात ?
हा डिप्रेशनचा शिकार
तो आत्महत्या करतो
ज्याला समजावं सेलिब्रिटी
तो एकाकीपणात मरतो
ज्यांनी कमावलं नाव
त्याला आनंद का मिळत नाही ?
काय चाटायचं ह्या मोठेपणाला
नातं आपुलकीचं जुळत नाही
जळजळीत वास्तव सांगतो
तुमचा विश्वास ह्यावर बसणार नाही गरीब, आडाणी , प्रामाणिक मजूरांचे मायबाप वृध्दाश्रमात दिसणार नाही
असं नाही त्यांचे घरात
नाहीत वादविवाद
पण घटस्फोट अन् वृध्दाश्रम
बोटावर मोजण्या एवढे अपवाद
आजारी मायबापांचा ईलाज करतात किडूक मिडूक विकून
पण जिव्हाळ्याची अजूनही त्यांनी नाळ ठेवली आहे टिकवून
व्यसनी, रागीट,नवरा
त्याला गरीबीची जोड
तरीही त्याची पत्नी बिच्चारी
करतेच ना तडजोड ?
दु:ख हलकं करतात
एकमेकांना भेटून
एका शिळ्या भाकरीचा तुकडा
खातात सारेजण वाटून
जेवढी लावतात माया
तेवढंच बोलतात फाडफाड
कितीदा तरी भांडतात
पण कुठे येतो ईगो आड ?
ऊशाशी दगड घेऊन
भर ऊन्हातही झोपी जातो
काळ्या मातीत घाम गाळणारा
बळीराजा कुठं झोपेची गोळी खातो ?
ना तोल ढळतो ना संयम
दु:खातही सावरण्याची आस
कारण अजूनही ह्या माणसांचा
आहे माणूसकीवर विश्वास
पण हल्ली इन्स्टंट रिझल्ट आले हे दळभद्री दिवस
देव सुध्दा लगेच बदलतात
जर पावला नाही नवस
एकत्रीत कुटूंब हल्ली
सांगा कुणाला हवं ?
कामा शिवाय वाटतं का
आपण कुणाच्या घरी जावं ?
एकदा तरी बघा जरा
आपल्या आयुष्याचा रोड मॅप
कुणाचं कुणाशी पटत नाही
काय तर म्हणे जनरेशन गॅप
सांगा बरं कुणावर ह्या
विकृत विचारांचा पगडा नाही
घर,बंगला, फ्लॅट असु द्या
दरवाजा कुणाचाही ऊघडा नाही
बहूत अच्छे, बहूत खुब !
क्या बात है ? बहूत बढीया एवढ्या ओसंडून वाहतात प्रतिक्रिया जागृत चोवीस तास सोशल मिडीया
आभासी दुनियेची चाले
कोरडी कोरडी ख्याली खुशाली
मोबाईलवर साऱ्या शुभेच्छा
मोबाईलवरच श्रध्दांजली
काय बरोबर ? काय चूक ?
मत मांडण्याचीही सत्ता नाही
तो बंद घरात मरून पडला
वास सुटला तरी शेजाऱ्याला पत्ता नाही
मुलं पाठवले परदेशात
आई संगे म्हातारा बाप कण्हतो
अंत्यविधी उरकून घ्या
पैसे पाठवतो असं पोटचा गोळा म्हणतो
लेकराला पाॅकेटमनी ,बाईक
अन् भलेही दिली जरी कार
किती छान झालं असतं
जर दिले असते संस्कार ?
होस्टेल ,बोर्डींगात बालपणीच पाठवलं
तो तुम्हाला का वागवणार ?
जमीन असो की जिवन
येथे जे पेरलं तेच ऊगवणार
जिवशास्र शिकवलं
जिवनशास्त्र शिकवा
चुलीत गेली चित्रकला
सांगा चारित्र्याला टीकवा
त्रिकोण,चौकोन ,षट्कोन
ह्याला सांगा विचारेल कोण ?
ज्याचे जवळ नसेल
आयुष्याचा दृष्टीकोन
विपरीत परिस्थीतीतही
जपणूक केली पाहीजे तत्वाची
व्याकरणापेक्षाही अंत:करणाची
भाषा असते महत्वाची
चुकू द्या चुकलं तर
अंकगणित अन् बीजगणित
माणसांची बेरीज करा
गुण नाहीत पण गुणवत्ता अगणित
प्राणपणाने जतन करावे
नाते शहर, खेडे ,गावाचे
मेल्यावरती खांदा द्यायला
असावे चारचौघे
जिवाभावाचे
मेल्यावर दोन अश्रू
हीच आयुष्याची कमाई
ज्याने हे कमावलं नसेल
तो आयुष्य जगलाच नाही
मिळून मिसळून वागावं
आनंदानं छान जगावं
तुम्ही सगळी मोठ्ठी माणसं
म्या पामरानं काय सांगावं ?
खुपच सुंदर रचना.. ज्याने कोणी ही रचली आहे त्यांच खुप खुप अभिनंदन आणि विनम्र वंदन...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा