गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

तिलांजली

तिलांजली

नाती जोडा, नाती जपा
म्हणणं किती सोपं असतं
फसवी फुसकी, ढोंगी नाती 
जपणं तितकच  कठीण असतं

जन्माने मिळालेल्या नात्यांपेक्षा
प्रेमाची नाती खरी असतात
स्वार्थाच्या मधाळ नात्यांपेक्षा
भांडणारी नाती बरी असतात

शेजारी-पाजारी, सगे-सोयरे
नावापुरते नाते असते
गरज पडता पाठ फिरवती
तेव्हा पितळ उघडे पडते

काही नात्यात धुसफुस-खुसपुस
काही कोरडे ठाक असते
भावनांचा नसतो ओलावा
प्रेमाचे ते नाव नसते

अशा नात्यात देण्यापेक्षा
घेण्याची हाव असते
राग-व्देष, जळफळाट
मनामध्ये आग असते

अशी नाती असण्यापेक्षा
नसलेलीच बरे असते
अशा नात्यांना नेहमीच
तिलांजली देणे बरे असते

:  अशोक कुळकर्णी यांच्या सौजन्याने.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा