शिक्षा
तू जिवंत असेपर्यंत
तुझे अस्तित्व मजला कळले नाही
आता तू नाहीस ..
नि शरीर पण जीर्ण होत चालले आहे ..
आता .. म्हातारपण जाणवतंय मला
खरे सांगू ?.. आता कोणी हातात चहा आणून देत नाही ..
कि अंघोळ झाल्यावर टॉवेल आणून देत नाही ..
माझाच मला आधार घ्यावा लागतो उभा रहायला ..
जुना रेडिओ पण कित्येक दिवस बंद आहे ..
पण .. मुलांना वेळ नाही दुरुस्त करून आणायला ..
दातकवळी हिरड्याना टोचते गं ..
पण मी जेवणाच्या घासाबरोबर वेदना गिळायला शिकलो आहे
घासागणिक तुझी आठवण येते ..
मिसरी पण सोडली मी आता... सुनबाईंना आवडत नाही ...
परवाच थालपीठ खावे वाटले ..
पण धारिष्ट नाही झाले कोणाला सांगायचे ..
तू असताना .. माझ्यासाठी वेगळे थालपीठ करायचीस ..
जेवणाचे ताठ समोर आले कि तुझी आठवण येते ...
आपले मातीचे तुळशीवृन्दावन पडून सिमेंटचे बांधले ग
तू जिथे दिवा ठेवायचीस ना .. तो कोनाडा मुजावला ..
मुलांना आता त्या दिव्याची आणि काजळीची गरज नाही वाटत..
आवाज खूप खोल गेलाय .. ३-४ हाका माराव्या लागतात
काही हवे असेल तर ..
तो आवाज तिथपर्यन्त पोहोचतो कि पोहोचत नाही
ह्याचे गणित नाही ग कळत आता मला ..
तू असताना .. मी न मारलेल्या हाकाही तुला कळायच्या ...
हात थरथरतात .. शब्द बोबडे झालेत .. पायातले बळ कमी झाले आहे
आठवणींची व्याकुळता वाढली आहे ..
तू असताना .. तुला होणाऱ्या त्रासाची
.... माझ्या हेकड स्वभावाला एकदाही जाण आली नाही
आता
तोंडाला कोरड पडते ...
डोळ्यात पाणी असते ...
खांदे दुखतात ...
बोलायला कोणी नाही
ऐकायला कोणी नाही ..
सांगायला कोणी नाही
जवळ बसायला कोणी नाही
आता
बाजल्यावर एकटा पडून असतो ..
तुझ्या आठवणीत ..
केलेल्या चुकांची बहुतेक
हि शिक्षा नसावी काय ?
वैभव