शनिवार, १९ डिसेंबर, २०२०

लहानपणी चे आठवणीतील नासिक ( *वृन्दा भार्गवे*)*( झी मराठी उत्सव नात्याचा २०१९ या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख)*

*नाशिकची दिवाळी*

मंदिर ते मदिरा हा प्रवास होण्यापूर्वीचे नाशिक..कपालेश्वर ..काळ्या रामाचे देऊळ,सांडव्यावरची  देवी, सुंदर नारायण मंदिर, एकमुखी दत्त,मोद्केश्वराचा गणपती ,सोन्या मारुती ,कापड्पेठेतील मुरलीधर यांच्या आजूबाजूला असलेल्या वाड्यात वस्ती करणारे.गोदेला गंगा संबोधत त्या तीर्थात पावन होणारे नाशिककर  ..मंदिरांचे कळस दुरून दिसत तेंव्हा हात आपसूक जोडले जात..पडक्या वाड्यांचे अरुंद बोळाचे ,फुलांच्या  बाजाराचे,पौरोहित्य करणाऱ्या  नि याज्ञिकांचे  एक तीर्थक्षेत्र.  ...
नवरात्र संपल्या क्षणी दिवाळीची चाहूल  लागायची.. भिंतीवरचे कॅलेंडर नाशिककरांना  कधी पाहावे लागले नाही..अनेक मंदिरं बाराव्या शतकातील ,काही पेशव्यांच्या काळातली ..त्या त्या सरदारांची.. एखाद्या प्रशस्त वाड्यात असणाऱ्या स्वयंभू देवाच्या वास्तव्याने ती आख्खी पेठ धन्य होई. पंचधातूच्या दीपमाळेला लख्ख करायला प्रारंभ झाला नि देवांना उटणी लावून स्नानासाठी तयारी होऊ लागली की  अजि म्या  देव पाहिला म्हणून हरखून जाणारा तो काळ.देवाचे दागिने पाहायला लगबगीने बायका जमत ..देवाचे हे रूप आगळे असे..तो अगदी आपला वाटे..  सारी मंदिरे धुतली जात..गंगेचे पाणी हाच अभिषेक..बिनदिक्कत तोंडात घेऊन आचमन केले तरी  पुण्याचे सोपान चढण्याचा आनंद.
गल्ली बोळातील वाड्यांचा प्रवास गंगेच्या काठापर्यंत संपून देखील जाई. .अरुंद रस्ते एकमेकांच्या कुशीत विसावत मेनरोड या नावाने आपली मिजास दाखवत राहात...हा रस्ता व्यापाऱ्यांचा, असंख्य दुकाने हातात हात घालून नतमस्तक झाल्यासारखी वाटत. कपड्यांपासून ते किराणामालापर्यंतची..सगळा माल त्यावेळेस  दोन तीन  रस्त्यांवर मिळायचा.भद्रकाली मार्केट,बोहोरपट्टी , रविवार कारंजा,कापडपेठ....दिवाळीची पाहिली चाहूल लागायची, जेंव्हा या दुकानातले सामान बाहेर काढले जायचे आणि दुकानांना रंग रंगोटी सुरु  व्हायची..लहानमोठा  दुकानदार आपल्या दुकानांना नवा साज द्यायचा.ही दुकाने आपलीच,रोजचा तिथला संबंध.खात्यावर टिपून ठेवा असे सहज सांगणारा तो काळ..दुकानदाराला घरातल्यांची नावे ठाऊक असायची..घरच्यांना दुकानदाराच्या मालावरचा विश्वास..कोणते सामान संपलंय,काय हवंय तो आठवण करून द्यायचा..धावत पळत ते सामान आणले जायचे..त्याने रंगाचे काम काढले की रस्त्यावरचा पसारा वाढायचा..पण त्याबद्दल तक्रार नसायची..जायला यायला त्रास नसायचा ,ना  तर कोणी दटावयाचे ..दिवाळीची चाहूल  मात्र अधिक गडद व्हायची. 
असंख्य आळ्या,पेठा नि वाडे सज्ज व्हायला सुरुवात होई..कुणी मातीचे रंग आणून ठेवे.चोपणीने जमीन चोपून काढे ..कधी पांढऱ्या मातीने तर कधी शेणाने सारवले जाई..संकोच हा शब्द  दूर दूर पर्यंत नसायचा. मागच्या पुढच्या गल्लीत एकतरी गोठा सापडायचा..शेणाची बादली घेऊन पोर टोरं जणू मोगऱ्याची फुले आणायला चालली आहेत अशा थाटात  बागडत जात..वसुबारसेला हा गोठा नदीकिनाऱ्यावरील जणू चिमुकले मंदिरच बनायचे.पुरणपोळी नि गवारीची भाजी..गाईच्या मुखात  देऊन तिच्या पाठीवरून हात फिरवत  तिला ओवाळत... तोच हात कपाळ नि गळ्याला लावत अनेकांची दिवाळी सुरु व्हायची...
जवळच्या आडगावात एखाद्या शेतकऱ्याच्या घरात कुम्भारणीकडून चूल रोवली जाई.धनगर, कुंभार, मांगाळीतून डालकी-सूप  विक्रीसाठी बाजारात आली.की ती घेण्यासाठी झुंबड उडायची.आपल्या मोटा, अवजार करून देणाऱ्या बारा बलुतेदारांना फराळ द्यायचा तर तो पायलीने व्हायला हवा..ती दिवाळी माणसांची माणसांसाठी होती..ब्राम्हण म्हणजे देव त्याला नमस्कार करायचा,तो गंगेच्या काठावरच्या मंदिराशेजारच्या वाड्यातला..शिवाय त्याच्या घरातच एक भलं मोठ्ठ देवघर.. तेथे असणारे अग्निहोत्र..तो आपल्या घरी या काळात आला तर घर लख्ख नको?
चाळीतल्या प्रत्येक घरी ,आणि स्वत:च्या वाड्यातल्या घरात रंग ,घरातल्या माणसानीच लावायचा हा जणू प्रघात.,..पोपडे पडलेल्या भिंती.,कोळीष्टके ,देवांच्या तसबिरी जुने फोटो नीट काढून ठेवले जात.घरातली जाणती मंडळी रंग आणायला बाहेर पडत..काही ठिकाणी मातीचे रंग तर  त्यापुढच्या काळात काही ठिकाणी ऑईलबॉंड डीस्टेमपर चे डबे घरात आणले जात ,झाकण उघडल्याक्षणी त्यात एक रुपयाचे नाणे दिसे.अप्रूपाने ते जपून ठेवत .आतला कणकेच्या गोळ्यासारख्या तो   दाबून ठेवलेला रंग . सांगितलेल्या सूचनेबरहुकुम पाणी टाकून तो  तयार केला जात असे..तोवर इतर कुणीतरी बोहोरपट्टीत जाऊन भिंत खरडायचे पत्रे घेऊन आलेले ..मग घरातल्या भिंती घासण्याचे काम सुरु व्हायचे ..मध्यमवर्गीय पांढरपेशी सारी घरे दिवसभर याच कामात मग्न..पेंटरचे काम फक्त ऑईलपेंट लावायचे असले तरच..बाकी कर्ती मंडळी रंगारी बनत..दिवाळीच्या आगमनासाठी सारे नाशिक सज्ज व्हायचे..
 गंगेला नमस्कार असला तरी त्यात दिवाळीच्या पूर्वी महिना पंधरा दिवस घरातल्या गोधड्या ,अंथरुणे धुण्यासाठी  गंगेवरच जायचे.बायका ठरवून निघत..माळ्यावरची तोंडे वाकडी केलेली भांडी मात्र चौकातल्या नळावर घासायला काढली की चिंच गोळ्याचा तो मीठ लावलेला वास....भांड्यावरचा  तो पहिला हात ,प्रथम त्याच्यावरचा धुळीची पुटे  काढली जात.,मग त्याचा जणू  मेकोव्हर होई...काळपट कुळकुळीत अंग चकचकीत होई .. अर्थात त्यापूर्वी कल्हईवाल्याचे आगमन . कल्हई केली जाई त्यावेळेस मांडी  मुडपून मुले  कोंडाळे करत कल्हईवाल्या भोवती बसत..तो  नवसागराचा चर्र आवाज आला की भांड आतून गोरे झाल्याची निशाणी..मग बाहेरून  लख्ख झाले की त्यावर पाण्याचा थेंब पडू न देण्याची खबरदारी घेत मांडणीवर ती ठेवण्यासाठी मुलांचा वापर होत असे..पितळ्याचे डबे रांगेत ठेवले जात..प्रत्येक वाड्यात मांडणीवरचे आकारानुसार डबे लागले की चुलींवर कढाया विराजमान होत.
दिवाळी तोंडावर आली हा शब्दप्रयोग ऐकायला यायचा तो भाजणीच्या खरपूस वासाने..एका घरापाशी भाजणी ,दुसऱ्या घरापाशी बेसन ..नाकाला आरामच नसायचा..अनुलोम विलोमाचे कोणतेही प्रकार आत्मसात करणारा तो काळ नव्हता..तरी आपोआप कपालभाती पर्यंत आम्ही पोचायचो.गोडसर,तळणाचे पदार्थ वाड्यात स्पर्धा केल्यासारखे असायचे..हे आत चालू असेपर्यंत बाहेर रांगोळ्यांचे ठिपके वाट पाहत गेरूने रंगवलेल्या चौकोनावर पहुडलेले असत..कुठे सात कुठे सत्तावीस ..आपल्याला कोणता आकार दिला जाणार त्याची प्रतीक्षा त्यांना असे.एखाद्या वाड्यातील चौकात रंग आणि रांगोळी घेऊन तरुण प्रौढ बायका बसत सज्जात उभे राहून त्यांची वाहवा करणारे, बहुदा फराळाच्या आसपास उभे न राहू देण्याची तंबी मिळालेले पुरुष उभे असत. .उंबरठ्यावर रोजच्याप्रमाणे लक्ष्मीची  आणि  गायीची पावले रेखाटून  रांगोळी कायम काढली जायची पण पुढे मोठ्ठ्या रांगोळ्या अगदी चित्रकथेची आठवण करून देणाऱ्या..रामसेतू पुलापाशी देवळाजवळ असाच कुणी अनामिक रामाची देवीची रांगोळी काढे नि त्याला नमस्कार करीत नारोशंकराच्या दिशेने अनवाणी पायाने बायका जाऊन ते डोळ्यात साठवून येत..
.नाशिक हे  मंदिरांचे गाव..शहराचा स्पर्श होण्यापूर्वी गावातली ही दिवाळी सगळ्यांची एकच असायची..फुलबाजार आणि मंदिरे यात कापडपेठेचा रस्ता..तोच भांडीबाजार,तोच सराफबाजार ..धनत्रयोदशीच्या दिवशी इथे नुसती लगबग ..झेंडूची फुले आणि आंब्याची पाने ..सजवण्यासाठी लागणाऱ्या याच दोन गोष्टी.दाराला तोरण किंवा सोडलेल्या माळा..पुड्याचे दोरे आणि मोठाल्या सुया-दाभण घेऊन मुलांना एका रांगेत बसवले जाई नि तासाभरात घर सजे.रोषणाई म्हणजे घरच्या घरी केलेला आकाशकंदील..बुरुडाच्या दुकानातून आणलेल्या बांबूच्या कामट्या..त्या सोलायच्या त्यातून कधी चांदणीचा आकार कधी अष्टकोन..त्याला लावलेला जिलेटीनचा रंगीबेरंगी पेपर..घरच्या घरी खळ तयार करायची.पतंगासाठीचे कागद ,त्याच्या केलेल्या झिरमिळ्या.दुपारभर हे काम पुरे..आतून एक काठी घेऊन खिडकीजवळ लावलेले कनेक्शन..संध्याकाळी आकाशकंदील लागला की हरखून जाऊन त्याकडे पाहणारे आपणच..पणत्या नव्याच्या जुन्या करायच्या. .पाण्यात टाकायच्या .. कारण काय, तर त्या  तेल पित  नाहीत .त्या शहाण्या, सवरलेल्या जणू सूनाच..समजूतदार.त्यातल्या वाती वेगळ्या..सहाणेवर निगुतीने तयार केलेल्या..किंवा फुलवाती..पणत्या उंबरठ्यावर तर असायच्याच..पण परसदारी..शौचगृहातही लावून ठेवलेल्या..
फटाक्यांसाठी आतुर असलेल्या पणत्या प्रत्येकाच्या दारी.,दिसेल त्या लहान मोठ्या देवळात पणत्या ठेवून येणारी अनेकजण.दहीपूल. भद्रकाली ,गाडगे महाराज पुतळ्यापाशी गर्दी उसळायची ,ती नवीन केरसुणी घ्यायला. अलक्षुमी  म्हणजे केरकचरा .तो काढायचा नि लक्ष्मीची  पूजा करायची..या वस्तू घेणाऱ्या कोणाशी घासाघीस नसायची..मनात शुद्ध भाव,नि त्या माणसांबद्दल आपुलकी.
..ही दिवाळी लाह्या विकणाऱ्या भुजारींची.बुरुडांची.,किकाभाई ,दगडू तेली,बुधा,पांडे,भगवंतराव ,सुगंधीं शिवाय पूर्ण होणे अशक्य..त्यांनी उटणे, लाह्या बत्तासे आकाशकंदील,रंग,किराणा ,मिष्टान्न घराघरात फराळाबरोबर द्यायला प्रारंभ केला.वड्नेरेंचा कर्णा या दिवाळीत रस्तोरस्ती फिरायचा..सासरहून माहेरी आलेल्या नलूचा कधी पुकारा,तर कधी दिन माहात्म्य..आज पाडवा..चला ओवाळा ..अमुक वाहिनी ,तमूक मावशी यांना करून दिलेली आठवण..सराफ बाजारातील सराफांकडून काही खरेदी केली आहे का हा प्रश्न..पगडबंद लेन असो की हुंडीवाला..बोहोरपट्टी असो की गोरेराम लेन तिथून एकदा का वडनेरेनी फेरी मारली की कुटुंबात चैतन्य येई..त्या काळातील ती होती जाहिरात..तोच युएसपी ..मंदिरात कीर्तन तसे  आकाशवाणीवर  त्या दिवसात हमखास कीर्तन असायचे ..पुढे दूरचित्रवाणीवरील काही वाहिन्यांवर लावले जायचे.
एखादे घर भले प्रशस्त.आजू बाजूलाच न्हाणीघर. दोन्ही शेजारी शेजारी..एक काळ्या दगडाचे तर दुसरे पांढऱ्या दगडाचे.. दोन्ही न्हाणीघराच्या मधोमध एक खिडकी..आजोबा अभ्यंगस्नान करायला खाली आले की बाहेरच्या चौकात चौरंगावर बसवत त्यांना तेल ,उटणे  लावायचे..घरातला हा अगदी मोठ्यांचा पाडवा.आजोबा आत न्हाणीघरात गेले की आजीने लगतच्या न्हाणीघरातल्या बम्बातले गरमगरम पाणी घंगाळ्यात काढायचे आणि त्या छोट्या खिडकीतून तांब्या तांब्याने आजोबांच्या घंगाळ्यात ओतायचे.सोवळ्यातील आजोबा प्रथम धाबलीने अंग कोरडे करायचे मग धोतर नेसायचे..कोरे करकरीत..अर्थात हा असा शौक काही घरातला..बाकी बंब असायचाच.तो पेटवण्यासाठी फारच लवकर उठावे लागे..दिवाळीत तर पहाटे तीन -साडे तीनलाच पाणी तापवायला सुरवात व्हायची.हे पाणी केवळ गरम नसायचे उकळते,पितळी नळ उघडताक्षणी त्या पाण्याचा तो ऊन स्पर्श उबदार बनवायचा.पाडव्याला पतीला ओवाळल्यावर मात्र पावलं काळ्या रामाच्या मंदिराकडेच वळत.
देवळात रोजच काकड आरती ..अर्थात नदीकाठच्या घरातच नव्हे तर नाशकातल्या विखुरलेल्या  आळ्यामध्ये ओवाळणे हा साग्रसंगीत प्रकार.नरकचतुर्दशीला आपण सूर्योदयापूर्वी उठलो नाही तर नरकात जाऊ ह्या भीती पोटी चाळीचाळीत नि वाड्या वाड्यात मुलांची फौज उठलेली.चौरंगाभोवती किंवा पाटाभोवती काही सेकंदात आजीने काढलेली रांगोळी.कणकेचे करून ठेवलेले दिवे.तापलेला बंब.प्रत्येकाच्या नावाचा तयार केलेला दिवा . तुझी फुलबाजी लावली म्हणत, प्रत्येकाला न्हाणीघरात पाठवत बाहेरून फुलबाजी लावणे.,अंघोळ झाली की ओवाळून घेत नव्या कपड्यात ओवाळून घेण्याची कोण घाई. नवे कपडे घालून देवाला जाण्याचा रिवाज.एकाच ताग्यातले सगळ्यांना कपडे ,पण कोणी कोणाला हसायचे नाही..कारण आनंद नव्या कपड्याचा असायचा.ते घालून मिरवायचे.कपडे शिवलेले..रेडीमेडचा जमाना फार पुढचा..शिंपी देखील वेळेत कपडे तयार ठेवायचा.गुंड्या आणि नाडीसकट.बाहेर पडायचे तरी नातलग,शेजारी,माणसांची भली मोठ्ठी यादी तयार असायची.
बायकांच्या न्हाणीचे मोठे प्रस्थ ..मंदिरात जायचे तर ओल्या केसांचा अंबाडा घालून,किंवा त्या ओल्या केसांचा  सैलसर शेपटा मिरवत.शिकेकाई नि रीठ्याचा मादकसा गंध मंदिरात अगरबत्तीच्या पूर्वीच दरवळायचा.. *सुगन्धी बंधूंचे फूल बाजाराच्या जवळचे दुकान..तिथे सुवासिक तेल उटणी ,सुगंधी द्रव्य पुढे त्याची जागा  न पाहिलेले साबण,नि मोती  नावाच्या अद्भूत साबणाने घेतली.,जो  अनेकांच्या तिजोरीत बंद असायचा.नि दिवाळीत दिसायचा,.काय त्याचे अप्रूप...अंगाला तेलाचे मालिश किंवा मर्दन नि नंतर ते काढण्यासाठी उटण्याच घर्षण.कपडे धुण्यासाठी पुढच्या काळात आलेला सनलाइट. आणि ५०१ चा बार.हे सारे दिवाळीत दिसायचे.*
देवाच्याच नव्हे तर देवळातील पुजाऱ्यांच्या -वडिलधाऱ्या सगळ्यांच्या पाया पडून आशीर्वादाची नुसती धांदल उडायची..दिवाळीच्या त्या चार दिवसात भेटेल त्याच्या पाया पडायला लावणारी घरे नि रस्त्यात निसंकोचपणे मोठ्यांच्या पाया पडणारी मुले ,तरुण .हे दृश्य अगदी पाहण्याजोगे असायचे.गाव लहान.माणसे जोडलेली.दिवाळीत सगळीच सात्विक व्हायची..नि आपण पावन पवित्र.फराळात चकल्या बेसनाचे लाडू साटोरी शंकरपाळे आणि पोह्यांचा चिवडा..चकलीला नळी असणे गरजेचे. ह्या पदार्थांचे प्रस्थ असले तरी खरा मान असायचा करंजी आणि अनारसा या सेलिब्रेटी पदार्थांना..हे दोन पदार्थ असे की जे देवाला प्रसादाला दाखवायचे.. करंजी भरली नसली तर तो खुळखुळा ..अनारसा नीट जमला नाही आणि तळताना तो फुटला की अनारसा फसला असे न म्हणता अनारसा हसला..असे म्हणणे .हे देखील नावे  ठेवण्यासाठी नव्हे तर पहिला फराळ संपल्यावर देवदिवाळीला तो चविष्ट व्हावा म्हणून..आपल्या घरातील फराळाचे ताट शेजारच्याच नव्हे तर अनेक घरात घेऊन जाण्याची प्रथा..ते देखील ताटावर क्रोशाचे मोठे वस्त्र टाकून..
भाऊबीज ..बहिणीचे भावाकडे येणे खूप मोठा संस्कार होता बहुजनसमाजात हाच दिवस अधिक महत्वाचा...मुलीचे लग्न होऊन सून होणे म्हणजे जणू प्रचंड उलथापालथ..मात्र ही  मुलगी सून  नावाच्या जेलमधून दिवाळी नावाच्या  पॅरोलवर सुटायची..भावाची व्याकुळ वाट पाहणारी ती ..प्रत्यक्ष भाऊ येणार नि घेऊन जाणार.. मग चार दिवस तिला न्हाऊ खाऊ घातले जायचे,तिच्या आवडीचे पदार्थ बनायचे..दिवाळीच्या सणा लेकी आसावली ..म्हणत तिच्यावर घराची पाखर व्हायची.
लक्ष्मीपूजनाला गुलालवाडीत ,यशवंत पटांगणावर भुइनळ्यांची आतषबाजी होई..फटाके मर्यादित होते.रस्त्यातला फटाका ,भुइचक्र माझ्या हातानेच पेटले गेले पाहिजे हा आग्रह नव्हताच मुळी.हे घेण्याची माझी आर्थिक परिस्थिती  नाही,पण मग एखाद्याने लावले तर ते पाहण्यातील आणि ऐकण्यातील  पराकोटीचा आनंद झिरपत राहायचा.हा या तीर्थक्षेत्राचा स्वभाव होता,मात्र आपापल्या घरचे पूजन  झाले की लोक आवर्जून नदीकाठच्या या पटांगणावर हे पाहायला येत..त्यावेळेस बाणांची स्पर्धाच लागायची जणू.. फटाक्यांसाठीची वेळ कोणी न लादता ठरलेली असायची....रविवार कारंजा,मेनरोड इथे लडीच्या लडी  फुटायच्या.त्या व्यापाऱ्यांच्या दुकानांमुळे... धनत्रयोदशीला त्यांच्याकडची वहीपूजा आख्खं गाव आनंदाने संध्याकाळी  अनुभवायचे. त्यांनी फटके उडवणे यावर कोणाचा आक्षेप नसायचा.प्रदूषण हा विषय डोक्यातही नव्हता.. पुढे पुढे फटाके विकत आणण्यासाठी गर्दी व्हायची पण मुलांना बरोबर  न घेता पालक ठरवायचे ,कोणाला काय आणायचे..सुतळीबॉम्ब हे आकर्षण..फुलबाज्या हा एक निरुपद्रवी प्रकार.टिकली त्यापेक्षाही बिचारी..लाल गडद  रंगाचा अद्भूत प्रकाश पाडणारी आगपेटी..त्यातली एक एक काडी पेटवत राहण्यातली मजा घेणारी घरातली सर्वात छोटी मुले ..कोणी कशाचा हट्ट धरायचे नाही..कारण उडणारे नि उडवणारे आपणच आहोत हे मनावर बिम्बवलेले..
देवदिवाळी ही नाशिकची  खरी खासियत..दिवाळी संपल्यावर पुन्हा वेध लागणार हरिहर भेटीचे.हरी म्हणजे सूर्य तर हर म्हणजे शिव.हरिहर भेट सोहळ्यात सुंदर नारायण मंदिरातील नारायण आणि कपालेश्वर मंदिरातील महादेव यांची मध्यरात्री भेट घडवली जाते..बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले तरी त्याच्या शंभरपट पुण्य एका कपालेश्वराला पाहून होते अशी ज्याची ख्याती तो हा कपालेश्वर .महादेवाला बेलाचे तर नारायणाला तुळशीचे पत्र वाहण्यात येते.वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी श्री विष्णू भगवान व शंकर भगवान यांची भेट होण्यासाठी रात्री बारा वाजता शंकर भगवान कपालेश्वर यांना वाहिलेला बेल, श्री सुंदर नारायण भगवान विष्णूंना वाहायला जातो..कपालेश्वराला तीन दिवस अर्ध्या भागात भगवान विष्णू तर अर्ध्या भागात शंकर भगवान पाहायला मिळतो.विष्णूला उभे तर शंकराला आडवे गंध लावले जाते..पाठीमागे आरसे ठेवल्याने विलोभनीय द्दृष्य दिसते...सुंदर नारायणाच्या देवळापासून बाण सोडले जात..ते कपालेश्वराच्या दिशेने...पुन्हा तेथून जे बाण सुटत ते सुंदर नारायणाच्या दिशेने जात..ही आतषबाजी पाहायला झुंबड उडायची.
गोदावरीच्या काठावर गाडगे महाराज पुलाजवळ आकाराने लहान असलेली देवळे लक्ष वेधतात..त्या आहेत समाध्या.साधारण शंभर वर्षांपूर्वी गावात राहणाऱ्या ,त्या काळातील लोकांचे आदराचे स्थान असलेल्या ऋषितुल्यांच्या या समाध्या.मोक्ष  मिळण्यासाठी त्यांनी केलेली देवाची आराधना .त्यानंतर त्यांना आलेला मृत्यू.. आठवण म्हणून त्यांच्या बांधलेल्या समाध्या..त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी या समाधीवर देव दिवाळी साजरी केली जाते.त्यांच्या घरातील आजची पिढी समाधीजवळ येते ..स्वच्छता करून संध्याकाळी पणत्या लावल्या  जातात...अनेकजण पूजा करतात.
त्रिपुरीला रामकुंडात जाऊन अंघोळ..दिवे सोडत डोळाभरला त्या दिव्याला नमस्कार..तुळशी विवाहाचा एखाद्या शाही विवाहासारखा उडवलेला बार..लोकांना दिलेले आमंत्रण..बालाजी मंदिरात होणारा उत्सव..आजही हे पूर्वापार चालत आलेले आहे..गावात जायला ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी जणू तिरुपती गावाबाहेर गंगापूर रोडला सोमेश्वराच्या पलीकडे दिमाखात विराजला आहे..त्रिपुरीला पणत्यांची आरास करण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या चार चाकी गाड्यांना जागा पुरत नाही.. 
खरे तर पुण्याचा-मुंबईचा  गणपती पाहायला देशभरातून लोक गर्दी करतात..नाशिक कुंभमेळ्यासाठी..इथल्या दिवाळीसाठी थोडीच प्रसिध्द?मात्र दिवाळीचा सामुदायिक रित्या आनंद घेणारे हे शहर होते..आज ,माझी हजाराची तुझी पाचशेची लड म्हणत स्पर्धा आली..गाव नि शहर आपसूक पूररेषेसारखे बाजूला झाले..सामूहिक शहाणपण विरजण्याऐवजी थोडे बिघडले.. *मी* कळसापेक्षा कितीतरी उंच झाला ..पण थंडी पडायला सुरुवात झाली ..नि दिवाळीपूर्वीच पिंपळाच्या पाराशेजारी नि आख्ख्या नाशकात पाडवा पहाटेची पोस्टर्स झळकू लागली की पावले पुन्हा गावाकडे वळतात..बदल झाला आहे...फराळा ऐवजी मिसळ खाल्ली जाते..चुकीचे काही नसतेच मुळी.
.राजाला रोजच दिवाळी ..आता  आपण सारे  राजे  नि राण्या. ..घरे अॅमेझॉननी सजली असतात..एशियन वा अन्य पेंट दरवर्षी भिंतीना असतो..रोषणाई साठी दिव्यांच्या माळा असतात..नि डिझायनर पणत्या..फराळ प्लॅस्टीकच्या पिशव्यातून येतो..दिवाळीतच नव्हे तर कोणत्याही दिवशी..एक सुखद बदल मात्र येथे घडला..हेरीटेज वॉकने प्राचीन  परंपरा , जीर्ण वास्तू , पुरातत्वशास्त्र याचा नाशिककरांशी हृदयस्थ संवाद सुरु झाला नि दिवाळीला कित्येकजण या ठिकाणी आवर्जून जाऊ लागले ..माणसे पुन्हा नव्याने नात्याचा गुणाकार मांडू लागली..चुलत मामे आते भावंडांचा शोध सुरु होऊन फॅमिलीचा ग्रुप तयार झाला..दिवाळीत नाही ,तरी देव दिवाळीत याच नाशिकला, असे आगत्याचे आमंत्रण दिले जाऊ लागले. संवादात  स्मरणरंजनाचा भाग अधिक आला.प्रदूषण तेंव्हा नव्हते..नि फराळामुळे कोणाचे घसे बसले  नाहीत...तेल,तूप शुध्द होते नि मनातील भाव देखील शुध्द होता ..आता भाव वाढला.. तो वस्तूंचा.. नि मनातील भाव हीन होऊन गेला.. हे आपसूक घडले तरी श्रद्धा असणारे भाविक या मंदिराच्या गावात दिवाळीत आले की  हात जोडतात नि अप्रूपाने त्रिपुरी पौर्णिमेला एक पणती प्रवाहात सोडतातच ....                                                                                                                                                            


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा