आमचं आता वय झालं
म्हणायचं नसतं
आता आमचं काय उरलं
म्हणायचं नसतं
म्हातारपण जवळ आलं म्हणून
घाबरायचं नसतं
तरुणपण दूर गेलं म्हणून
खंतावायचं नसतं
अल्लड वयातलं स्वप्नपाखरु
घरट्यात आलेलं असतं
तारुण्यातलं भरकट तारू
स्थिर झालेलं असतं
टक्के-टोणपे खाऊन जग
कळू लागलं असतं
खाचा-खळगे टाळून मन
वळू लागलं असतं
असं मधलं वय खरं तर
मस्त-मस्त असतं
हसत खेळत जगणं मात्र
आपल्या हाती असतं
असं परिपक्व मधलं वय
उपभोगायचं असतं
भोगापेक्षा त्यागात आनंद
मानायचं असतं
: अशोक कुळकर्णी¹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा