शनिवार, २९ जानेवारी, २०२२

खरी नाती

नाती कशी असावीत?

नाती  पाकात मुरलेल्या #गुलाबजाम इतकी गोडच असावीत असं नाही. खरंतर ती तशी गोड मिट्ट असूच नयेत. कारण 

ती गुलाबजामसारखीच महाग आणि मर्यादितच असतात.

          नाती टपरीवरच्या #कांदाभजीसारखी असावीत अगदी साधी पण हवीहवीशी. कधीही कुठंही हाकेला ओ देऊन धावत येणारी. 

           नाती असावीत गरमागरम #चहासारखी, एकदा भुरका मारला की डोकं आणि मन फ्रेश करुन देणारी. 

      नाती असावीत साध्या #वरणासारखी अहंपणाचा मसाला भरलेल्या कटाच्या आमटीसारखी तिखट आणि जळजळीत असू नयेत. कटाची आमटी पिताना मजा वाटते खरी पण दुस-या दिवशी आमटी तिचा प्रताप दाखवते.

          नाती पुरणासारखी पचायला जड असू नयेत. ती जितकी #मक्याच्या-लाह्यांसारखी हलकी असतील तेवढी दिवसेंदिवस फुलत जातात.

      नाती सीताफळासारखी असू नयेत.समज कमी नि गैरसमज जास्त.एकवेळ ती #फणसासारखी असतील तरी चालेल.वरुन काटेरी आतून रसाळ

        नाती असावीत #सुधारसासारखी, आपल्या आर्थिक चणचणीच्या काळात पक्वान्न खाल्ल्याचं समाधान देणारी. 

     नाती कडूही असावीत पण  कारल्याइतकी असू नयेत. ती #मेथीच्या-भाजीइतकी कडवट असावीत त्यांचा कडवटपणाही जीभेला चव आणणारा असावा. 

        नाती श्रीखंडासारखी श्रीमंत नसली तरी चालेल पण #ताकासारखी शिणवटा दूर करणारी असावीत.

 #कैरीसारखं एखादं नातं असेल तर त्याचा मुरांबा मात्र आपल्याला करता यायला हवा.

 #आंब्यासारख्या मधुर नात्यावर काही प्रक्रीया करण्याची गरजच नसते. ते उपजतच सर्वांगसुंदर आणि राजेशाही थाट मिरवणारं असतं.

         नाती दूधासारखी नासणारी नकोत. #तूपासारखी अमर हवीत. पाण्याचा शिबका मारला की कडकड आवाज करणारं तूप त्याच्या घमघमाटानं घर भरुन टाकतं. तशी नातीसुद्धा पुरेपूर कढलेली आणि सुगंध पसरवणारी असावीत. 

         नाती चायनिज आणि इटालियन सारखी आधुनिक ढंगाची असली तरी हरकत नाही पण त्यातही कण्या आणि आंबिलीतली सात्विकता हवी. पौष्टिकता हवी. 

       नाती असावीत देवाला दाखवलेल्या #नैवेद्याच्या पानासारखी. मात्र नैवेद्याच्या पानात वेगळं मीठ वाढलेलं नसतं. कारण पदार्थांमधलं मीठ बरोबर असतं. हे चवीपुरतं मीठ प्रत्येक पदार्थात असावंच लागतं.

     नैवेद्याचं पान देवाने उष्टं केलेल, त्याला सर्वच मान देतात. मग चटणी कोशिंबीर असो वा पोळीभाजी, नैवेद्याच्या पानातल्या सर्वांना अगदी आदराची, पावित्र्याची वागणूक मिळते. नैवेद्याचं पान खायला मिळणं भाग्यात असावं लागतं हेच खरं!
संग्रहीत पोस्ट.
विवेक कुलकर्णी  यांचा आभारी cp

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

वांमला ऑटी/हातवळणे

जीवन जगण्याचे काही सुंदर तत्व

1..भुंकणारे कुत्रे कधी चावत नाही!!
2..एक निंदक घरात असावा!!
3..किड्यामुंग्या सारखे जगू नका!!
4..पडेल ते काम करा!!
5..कोणतेही ही काम लहान किंवा मोठे नसते..
6..हसतील त्यांचे दात दिसतील!!
7..खरं बोलायला कधीच घाबरु नका!!
अन् खोटं बोलण्याने कोणाचं भल होणार असेल तर वेळप्रसंगी जरूर खोटं बोला!!
8..अशक्य असे काहीच नाही!!
9..चालायला लागेल तर दोनच गोष्टी घडत असतात
एक तर वाट चुकते किंवा थेट नेऊन सोडते!!
अन् वाट चुकली की काही तरी कानाला खडे लावणारं शिकवुन जाते!!
10..जे पेराल तेच उगवेल
11..आळशी माणसाचा नादी लागत बसु नका!!
12..बोलुन तोंड खराब करू नका!!
13..पण जर एखादा उलट्या डोक्याचा माणूस असेल तर जमतील तितके बोल लावा!!
14..कुणापुढे हात पसरू नका , वेळ प्रसंगी उपाशी रहा, पण भीक मागुन खाऊ नका!!
15..लाथ माराल तिथे पाणी काढण्याचे सामर्थ्य स्वतः मध्ये तयार करा!!
16..तुमचा शिल्पकार कोणी बाहेरून येणार नाही
तुम्हालाच तुमचा शिल्पकार बनवा लागेल!!
17..चरित्र हा सगळ्यांत मोठा दागिना आहे, कुणी त्याच्यावर डाग लावायला गेला, तर त्यांचे त्याला असे काही खणखणीत उत्तर द्या! की पुढच्या वेळी तुमच्याकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत झाली नाही पाहिजे !!
18..जर कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तर त्यानें तुमच्यावर विश्वास ठेवावा म्हणून त्याचे पाय धरायला जाऊ नका!!
एक लक्षात घ्या जर तुम्ही सच्चे असाल तर ते सिध्द करावे लागणार नाही असे नाही पण ते सिध्द करण्यासाठी तुमचा स्वाभिमान गहाण टाकण्याची गरज नाही..
19.. सोबत काही आणले नाही अन् सोबत काही नेणारं नाही, त्यामुळे उगाच मोह करत बसु नका!!
20.. अन्न हे पूर्णब्रह्म आहे.. ताटात पडेल ते आवडीने खा!!
21.. तुमचं हक्काचं असे या भूमीवर काहीच नाही. सगळ मातीतून आले आहे अन् मातीत जाणार आहे..
22.. एकच करा माणसाला माणूस जोडत जा!!
23.. वाईट मार्गाने पैसा कमवू नका, कारण वाईटाला हजार पळवाटा!!
24.. जे हक्काचे आहे ते सोडू नका अन् जे तुमचे नाही त्यावर हक्क गाजवायला जाऊ नका!!
25.. अन्न,वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत.. बाकी सगळे शौक!!
26.. माझे माझे अन् मातीत जा जे!!
27.. ओझे बननण्या पेक्षा आधार बना!!
28.. स्वाभिमान अन् अभिमान ही दोन्ही तत्वे वेगळी आहे..
29.. लोकांस सांगे ब्रम्हज्ञान अन् स्वतः मात्र कोरडे पाषाण असे बनू नका!!
30.. एक नाते जोडल्याने जर हजार नाती तुटणार असतील तर त्या एका नात्याला विश्वासात घेऊन त्या नात्यापासून लांब जाण्याचा निर्णय घ्या!!
अन् एक नाते जोडल्याने हजार नाती आनंदाने भरून पावणार असतील तर ते नाते हसत हसत स्वीकारा कधी ना कधी त्या नात्याचा देखील तुम्ही प्रेमात पडाला...

आयुष्य खुप खुप सुंदर आहे...
त्याचा आनंद घ्या!!
तुमच्यामुळे जर हजार लोकं जरी हसले तरी तुमच्या जन्माचे सार्थक झाले असे म्हणता येईल...

!!वनमाला औटी/ हतवळणे!!
जय श्री स्वामी समर्थ महाराज..
🙏🙏🙏🙏

एका बापाने मुलाला लिहिलेले पत्र

प्रत्येक बापानं वयात येणा-या प्रत्येक मुलाला आवर्जुन लिहाव अस पत्र.

नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचायला सांगा.... 
पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी कि ज्यावेळी जसा मूड असेल तसा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ समजून येईल.

"माझ्या लाडक्या मुला. मी हे असं तुला पत्र लिहितोय बघ, वाच, आणि ठरव....

जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अर्त्यक्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या बऱ्या.

मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार.

मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय.

माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे. जेंव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी तु चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस.

जगणं कशानेच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही.

आयुष्य फार छोटं आहे आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा.

प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणेही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस.

अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच ! पण याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना.

माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचा.

आणखी एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही. 
बाळा कदाचीत तुला हे पाठविलेले पत्र आवडेल कि नाही हे माहीत नाही पण हे पत्र तुझ्या आयुष्याची शिदोरी नक्की बनेल हे मात्र पक्क. म्हणुन बाळा हे पत्र तुला आवडो वा ना आवडो लगेच फेकुन देऊ नकोस या पत्राला तु नेहमी तुझ्या सोबत ठेव व वेळ मिळेल तेंव्हा पुन्हा पुन्हा वाच.....

फक्त तुझेच वडील
Cp